Ø पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला उर्त्स्फूत प्रतिसाद
Ø 200 उमेदवारांची प्राथमिक निवड
नागपूर :- ‘कौशल्य’ हा शब्द माणसाच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास निर्माण करतो . विद्यार्थीदशेत कौशल्यावर आधारीत ज्ञान संपादन केल्यास यश मिळविणे सोपे होते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आज येथे केले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व श्री निकेतन आर्टस् कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सैतवाल जैन संघटन मंडळ सभागृह गणेशनगर येथे ‘पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला. यावेळी टाके प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कौशल्य विकास रोजगार उद्योजकताचे उपायुक्त प्रकाश देशमाने, श्री निकेतन बहुउद्देशिका संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद गंधे, सचिव प्रसाद गंधे , मार्गदर्शन अधिकारी ज्योती वासुरकर उपस्थित होत्या.
टाके म्हणाले, विद्यार्थ्यांनी ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी एक व्हिजन समोर ठेऊन सतत प्रयत्न करुन यश मिळेपर्यंत तप साधनेप्रमाणे पाठलाग केला पाहिजे . रोजगार मेळाव्यामध्ये निवड होईल , तर काहींच्या पदरी अपयश पडेल पण निराश होवू नका .शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील . शासनाच्या विविध योजना या लोकाभिमूख असून ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाव्दारे योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचिविण्यात येत आहे.
या रोजगार मेळाव्यात नागपूर विभागातील एकूण 510 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 200 उमेदवारांची नामवंत उद्योगांनी प्राथमिक निवड केली. तसेच शासकीय विविध वित्तीय महामंडळ यांचे प्रतिनिधीनी उपस्थित राहून त्यांच्या विभागाच्या विविध स्वयंरोजगार, उद्योग कर्ज योजनांची माहितीचे फलक लावून प्रत्यक्ष माहिती देण्याल आली.
मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांनी ओएएम इंडस्टिज, श्री चिक्की, सुरुची स्पायसेस, टॉग ग्लास एमआयडीसी, वैभव एंटरप्रायेजेस, मॅक्स लाईफ, एसबीआय लाईफ, दिशा इंजिनियरिंग, महालक्ष्मी धातू उद्योग, नवा किसान बायो, द ट्रायल कोऑपरेटीव्ह, जस्ट डायल अकोला, उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक, हॅपी ग्रुप, द युनिव्हर्सल ग्रुप, नाईट पेट्रोल सेक्युरिटी सर्विसेस, पेटीएम, टाटा स्ट्राईव्ह, मॅजीक बस इंडिया फाउंडेशन, रिलायंस निपॉन, इत्यादींनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार दिला.
उपायुक्त देशमाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पाठक यांनी केले तर आभार डॉ.कांचन जोशी यांनी मानले.