– एकूण ३०७ कोटी कर वसुली : मनपा आयुक्तांनी केले कर विभागाचे अभिनंदन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने निर्धारित केलेले २०२३-२४ या वर्षाचे कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले आहे. मालमत्ता कर विभागाद्वारे वर्षभरात एकूण ३०७ कोटी कर संकलन करण्यात आले असून ही रक्कम निर्धारित लक्ष्यापेक्षा ७ कोटीने जास्त आहे. मालमत्ता कर संकलनाचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा ३२ टक्क्यांनी जास्त आहे, हे विशेष.
मालमत्ता कर विभागाच्या या कामगिरीबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्यासह महसूल विभागाचे उपायुक्त मिलींद मेश्राम व त्यांच्या संपूर्ण चमूचे विशेष अभिनंदन केले. पुढील वर्षी देखील विभागाकडून अशीच कामगिरी करून ३३० कोटींचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करू, असा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत विभागाने निर्धारित उद्दिष्टापेक्षा ७ कोटी अधिक म्हणजे एकूण ३०७ कोटी रुपये कर संकलन केले. झोनस्तरावर करण्यात आलेल्या या कर संकलनामध्ये ७ झोननी १०० टक्के कर संकलनाचा आकडा गाठला आहे. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, मंगळवारी या सात झोननी १०० टक्के मालमत्ता कर वसुली केली आहे. शेवटच्या तीन दिवसांमध्ये मनपाने मालमत्ता कराचे २० ते २२ कोटी रुपये वसूल केले आहेत.
कर वसुलीसाठी मनपाद्वारे ‘अभय योजना’, मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची जप्ती करणे, वाणिज्यक वापर होत असलेल्या मालमत्ता करीता थकीत असलेल्या मालमत्ता कराची रक्कम वर्षानुवर्षापासुन मालमत्ता कर रक्कम मनपाच्या निधीत वेळेच्या वेळी जमा न केल्याने व ५ लक्ष पेक्षा जास्त मालमत्ता कर रक्कम थकीत असणारे, व १ लक्ष ते रु. ५ लक्ष मालमत्ता कर रक्कम थकीत असणारे मालमत्ताधारकांवर कार्यवाही करुन थकीत रक्कम वसुल होणेस्तव झोन स्तरावरील मालमत्ता कर विभागाच्या चमूने प्रत्यक्ष मालमत्ता कर रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांकडे भेट देऊन मालमत्ता कर अभय योजनेची मिळणारी सुट पटवून देणे, ऑनलाईन कर भरणा केल्यास १५ टक्के पर्यंत सवलत अशा विविध योजना राबविण्यात आल्या. या योजनांचा फायदा व मालमत्ता कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उद्दीष्ठापेक्षा जास्त वसुली झाली.
कर वसुलीसाठी मनपाद्वारे १ जानेवारी पासून ३१ मार्चपर्यंत ‘अभय योजना’ राबविण्यात आली होती. याअंतर्गत थकीत मालमत्ता करामध्ये ८० टक्के सूट देण्यात आली. मनपाच्या मालमत्ता अभय योजना अंतर्गत १०३३२८ मालमत्ताधारकानी रु १०१.७७ कोटी मनपा खात्यात जमा केले.