आदिवासींच्या बलस्थानांना विज्ञानाची जोड देवून विकास प्रक्रिया गतिमान करणे शक्य;  ‘आदिवासी विकासासमोरील आव्हाने’, परिसंवादातील सकारात्मक सूर

नागपूर : देशाच्या विविध भागातील खनिज संपत्ती, निसर्ग आणि वनसंपदा जपणारा आदिवासी समाजच सामाजिकदृष्टया मागास राहिलाय हे कटूसत्य आहे. आदिवासींच्या बलस्थानांचा उपयोग करून त्याला विज्ञानाची जोड देत त्यांच्या विकास प्रक्रियेला गतिमान करता येईल, असा सकारात्मक सूर आज आदिवासी विज्ञान काँग्रेसच्या परिसंवादात निघाला.

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये शहीद बिरसा मुंडा सभागृहात ‘आदिवासींच्या विकासासमोरील आव्हाने’, या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नागालँड विद्यापीठाचे माजी कुलगुरु पी.लाल हे होते. रोहतक येथील एम.डी. विद्यापीठाच्या प्रा. विनोद बाला टक्साक, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.हेमलता वानखेडे, मैसूर स्थित सीएसआयआर अन्न तंत्रज्ञान विभागाचे संशोधक डॉ.प्रकाश हलामी यांनी परिसंवादात सहभाग घेतला.

डॉ. पी.लाल यांनी नागालँड मधील आदिवासींच्या समृद्ध जीवन पद्धतीवर प्रकाश टाकत या समाजासमोरील आव्हानही अधोरेखीत केली. राज्यात अनगामी,आवो,चकेशांग,चांग अशा एकूण 17 आदिवासी जमाती असून कृषी आणि नैसर्गिक संपदेत त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. आदिवासींद्वारे 650 मसाल्याच्या जिन्नसांचे उत्पादन घेण्यात येते. आदिवासींद्वारे वर्षाकाठी 400 मेट्रीक टन मध उत्पादन घेण्यात येते. 2030 पर्यंत हे उत्पादन 500 मेट्रीक टन करण्याच्या दिशेने कार्य सुरु आहे. तथापि, पायाभूत आणि आरोग्य सुविधांच्या अभावी या समाजाच्या विकासासमोर अडसर निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी विज्ञानाच्या मदतीने आदिवासी समाजाच्या विविध क्षेत्रातील बलस्थानांचा उपयोग करणे गरजेचे असल्याचे डॉ लाल यांनी सांगितले.

डॉ. विनोद बाला यांनी आदिवासी समाजाने दिलेल्या योगदानांबाबत निरीक्षणे मांडली. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी या समाजासमोरील समस्यांबाबतचे निरीक्षणही त्यांनी मांडली. या समाजाला शिक्षीत करून विज्ञानाच्या मदतीने समस्यांचे निराकरण करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. हेमलता वानखेडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा व जीवनपद्धतीवर प्रकाश टाकत समस्यांबाबतही भाष्य केले. आदिवासी महिलांची रेशीम उद्योग,दूग्ध आणि मत्स्य व्यवसायातील प्रगतीही त्यांनी मांडली. मलेरीया,टिबी रोगांच्या साथीमुळे जिल्ह्यातील आदिवासींसमोर उभी ठाकलेली समस्या मांडतानाच विज्ञानाच्या मदतीने यावर उपाय काढण्याचा सकारात्मक विचारही त्यांनी मांडला.

डॉ.प्रकाश हलामी यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली मानवी जठरातील जीवाणुंच्या तुलनेत आदिवासींच्या जेवणातील अन्नघटकांमुळे त्यांच्या आयुर्मानात सकारात्मक बदल झाला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना शुद्ध हवा पाण्यासोबतच ताजी फळे, भाज्या मिळतात. त्यामुळे त्यांच्या जठरामध्ये चांगल्या जीवाणुची निर्मिती होत असल्याचे त्यांनी आपल्या संशोधनात मांडले आहे. आदिवासींचा विकास साधण्याच्या दिशेने विज्ञानाचा आग्रह धरतानाच त्यांच्या बलस्थानाचाही वापर व्हावा असे विचार त्यांनी मांडले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाळशास्त्री जांभेकर अर्धपुतळ्याचे शुक्रवारी पत्रकारभवनात अनावरण

Wed Jan 4 , 2023
नागपूर :-मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धपुतळा येत्या मराठी पत्रकारदिनी, शुक्रवार, 6 जानेवारीला दुपारी 3 वाजता टिळक पत्रकार भवनात स्थापित केला जाणार आहे. टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी यांच्या हस्ते अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ट्रस्टचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com