Ø मोहिमेचा विभागस्तरीय आढावा
नागपूर :- विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी या मोहिमेस विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये गती देण्याच्या सूचना, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात खोडे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या सोबत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, सहायक आयुक्त स्वाती इसाये, विभागीय समन्वयक छत्रपाल पटले तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत विविध योजनांसाठी पात्र असलेल्या पण लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यांद्वारे करण्यात येत असलेल्या कामांविषयी यावेळी खोडे यांनी माहिती घेतली.
वैयक्तिक अनुभव कथनाद्वारे शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रे दरम्यान निश्चित करण्यात आलेल्या तपशिलाद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. यात्रेत सहभागी महिला व पुरुष, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, आरोग्य, स्वच्छता व पाणी पुरवठा, बँके संबंधातील योजना, कृषी संबंधातील योजना आदींचा आढावा घेऊन या मोहिमेस गती देण्याच्या सूचना खोडे यांनी केल्या.