– प्रमाणिकरणासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक
– १ हजार ६८१ पात्र शेतकरी लाभापासून वंचित
यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी दि.७ सप्टेंबरपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी केवळ ३ दिवस शिल्लक असून या कालावधीत प्रमाणिकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्णी तालुका १२६, बाभुळगाव ८१, दारव्हा १०५, दिग्रस ५०, घाटंजी १८०, कळंब ३५, केळापूर ७३, महागाव ७५, मारेगाव ८४, नेर ४२, पुसद १४९, राळेगाव ११४, उमरखेड ८२, वणी ३०४, यवतमाळ १२३ व झरी जामणी तालुक्यातील ५८ अशा एकून १ हजार ६८१ पात्र शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आधार प्रमाणिकरण केलेले नाही.
या योजनेमध्ये विशिष्ठ क्रमांकाच्या यादीत नाव आलेल्या तथापी आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ मिळू शकणार नाही. आधार प्रमाणिकरण करण्यासाठी फक्त ३ दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने विशिष्ठ क्रमांकाच्या यादीत नाव असलेल्या परंतू अद्यापही आधार प्रमाणिकरण न केलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.