रामटेकमध्ये पुन्हा ट्विस्ट! वंचितचा काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा

नागपूर :- रामटेक लोकसभा मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना बुधवारी पाठिंबा जाहीर केला. येथील वंचितचे अधिकृत उमेदवार व भाजपचे बंडखोर शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारणावरून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

रामटेकमध्ये काँग्रेसच्या आधीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता. आता चहांदे यांनी माघार घेतली. रामटेकमध्ये सातत्याने नाट्यमय राजकीय घडत असल्याने मतदार बुचकळ्यात पडले आहेत.

विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वंचितने किशोर गजभिये यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर चहांदे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते.

गजभिये हे काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता वर्तविली जात होती. रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यास आपल्या नावाचा विचार केला जाईल असे गजभिये यांना वाटत होते. हे बघून वंचितने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला होता असे समजते.

गजभिये मागील लोकसभेच्या निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. तत्पूर्वी उत्तर नागपूर विधानसभा मतदासंघातून त्यांनी बसपाच्या हत्तीवर निवडणूक लढवली होती. रामटेकमध्ये त्यांना माजी मंत्री सुनील केदार यांनी विरोध दर्शवला होता. निवडणुकीत त्यांचे कामही केले नव्हते. यावेळीसुद्धा त्यांच्या नावाला केदारांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे गजभिये यांनी बंडखोरी केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघात वंचितचा पाठिंबा मिळाल्याने काँग्रेसचा उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शंकर चहांदे यांनी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढण्यास पक्षाकडे असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे आम्ही किशोर गजभिये यांना समर्थन दिल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केलाय, जाणीव ठेवा”; ठाकरे गटाने पुन्हा डिवचले

Thu Apr 4 , 2024
मुंबई :- भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीला अद्याप ११ लोकसभा जागांचा फैसला करता आलेला नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही काही जागांवरून धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील तणाव काहीसा वाढताना दिसत आहे. यातच ठाकरे गटाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com