– शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा
– भदन्त सुरेई ससाई यांची माहिती
नागपूर :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने (2 हजार 568 वी बुद्ध जयंती) तीन दिवसीय बुद्ध महोत्सव 23 ते 25 मे दरम्यान दीक्षाभूमीवर होत आहे. गुरुवारी 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
या कार्यक्रमाला बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भदन्त धम्मसारथी यांच्यासह भिक्खू संघ व भिक्खुणी संघ उपस्थित राहतील. समारंभात उपस्थित लहानथोर अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर आयुष्यभर दहा शिलांचे पालन करण्याचे व्रत घेतील. श्रामणेर दीक्षा घेऊन तथागत बुद्धांचा धम्म अनुसरण्याचा निर्धार करतील. श्रामणेर यांचे निवासी प्रशिक्षण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या उंटखाना शाखेतील बुद्धिस्ट सेमिनरीत होईल. सात दिवसीय शिबिरादरम्यान भदन्त धम्मसारथी बुद्ध, धम्म व संघ याविषयी मार्गदर्शन करतील, असेही ससाई म्हणाले.
भदन्त ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 24 मे रोजी सायंकाळी 6 वाजता भदन्त धम्मसारथी, भदन्त नागवंश, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त धम्मविजय, भिक्खूणी संघप्रिया व भिक्खू संघ करुणा, शांती, मैत्री व बुद्धाचा कल्याणाचा मार्ग यावर प्रवचन देतील. शनिवारी 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजता प्रबुद्ध बागडे आणि गायक-कलावंतांतर्फे ‘प्रबुद्ध हो मानवा’ हा बुद्घ-भीमगीतांचा कार्यक्रम सादर करतील. यासोबतच अंगुलीमाल, आम्रपाली लघुनाट्य व भीम गर्जना नृत्य सादर करतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भदन्त धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागाप्रकाश, भंते नागसेन, भंते प्रज्ञा बोधी, भिक्खूणी संघप्रिया, रवि मेंढे यांच्यासह भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, उपासक, उपासिका प्रयत्नशील आहेत.
संपर्क साधा
बालकांना श्रामणेर बनविण्याची इच्छा आहे, त्यांच्या पालकांनी इंदोरा बुद्ध विहार व बुद्धिस्ट सेमिनरी, उंटखाना येथे संपर्क साधवा. बालकांच्या डोक्यावरील केस काढून त्यांच्यासाठी काशाय वस्त्र तयार करून ठेवावे, बुद्ध विहारातील भंन्तेनी बालकांची यादी सादर करावी, असे आवाहन भदन्त ससाई यांनी केले.