संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर १५ दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत, सरकार मुली व महिलांचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शासन व प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत आहेत. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व गृहमंत्री जबाबदार आहेत .
बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीने बंद पुकारला होता पण मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर कामठी विधानसभाचे नेते माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात आज 24 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता कामठीत जयस्तंभ चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जी प सदस्य दिनेश ढोले,कांग्रेस कामठी शहराध्यक्ष रमेश दुबे,राजेश बनसिंगे, लक्ष्मण संगेवार ,गुड्डू मानवटकर,नीरज यादव,मो इर्शाद शेख, सलामत अली,आशिष मेश्राम,प्रमोद खोब्रागडे,राजकुमार गेडाम,सुरेय्या बानो, ममता कांबळे,वैशाली मानवटकर, शिवसेना उबाठा चे राधेश्याम हटवार,मुकेश यादव,विराग जोशी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे डॉ नौशाद सिद्धीकी यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते गण मोठ्या संख्येत उपस्थित होते.
याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर म्हणाले की युती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. सरकारला जनतेचे माता भगिणींच्या सुरक्षेचे काही पडलेले नाही फक्त राज्याला ओरबाडून खाण्याचे काम सुरु आहे. आपल्या माता भगिणींच्या सुरक्षेसाठी आता या सरकारला घालवावे लागणार आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या जिल्ह्यातच कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. बदलापूर प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला, मा. उच्च न्यायालयाने महायुती सरकारचे थोबाड लाल केले व जनतेने उद्रेक केल्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. विकृत, चोर, लुटारू, दरोडोखोर सरकारचा निषेध करण्यासाठी व आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.याप्रसंगी कंग्रेस सह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.