– मनपा आयुक्तांनी दिली अग्निशमन केंद्राला भेट
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता. १८) गंजीपेठ अग्निशमन केंद्राची पाहणी केली. गंजीपेठ अग्निशमन केंद्राची इमारत जीर्ण झालेली असून त्या जागेवर नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्राचे बांधकाम प्रस्तावित आहे.
अग्निशमन केंद्राच्या पाहणी प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त सर्वश्री अशोक गराटे, गणेश राठोड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे उपस्थित होते.
प्रस्तावित नवीन अग्निशमन केंद्राची इमारत ही तळमजला अधिक एक माळ्याची असणार आहे. या केंद्रावर ४ अग्निशमन वाहनांची व्यवस्था असेल. गंजीपेठ अग्निशमन केंद्राची निर्मिती १९२७ मध्ये करण्यात आली होती. सध्या ही इमारत जीर्ण झालेली आहे. नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्रामध्ये अद्ययावत कार्यालय देखील असणार आहे. गंजीपेठ अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. या अग्निशमन केंद्रामधून महाल, गांधीबाग आणि मोमीनपुरा सारख्या दाट रहिवासी क्षेत्राला सुरक्षा पुरविली जाते.
मनपा आयुक्तांनी गंजीपेठ अग्निशमन केंद्राच्या पूर्ण इमारतीची पाहणी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांचे निवास स्थानाला देखील भेट देउन पाहणी केली. गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्र नागपूरमधील पहिले अग्निशमन केंद्र असून ही इमारत ९८ वर्ष जुनी आहे. सध्या इथे ३ अग्निशमन वाहन ठेवण्याची व्यवस्था आहे. इंग्रजांच्या काळात १७०० वर्ग मीटर क्षेत्रामध्ये या केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या जागेवर नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्राकरिता लवकरात लवकर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
यावेळी सहायक आयुक्त घनशाम पंधरे, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, तुषार बारहाते, अग्निशमन केंद्र अधिकारी सय्यद शौकत अली. अजय लोखंडे, सुधाकर गवई आदी उपस्थित होते.