‘तो’ मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध करून दिली

– भामरागड येथील दुचाकीवरून मृतदेह प्रकरणात आरोग्य विभागाचा खुलासा

– मोबाईल कव्हरेजची अनियमितता आणि नातेवाईकांना शववाहिकाबाबत माहिती नसल्याने गोंधळ

गडचिरोली :- भामरागड तालुक्यातील कृष्णार येथील रहिवासी मयत गणेश लालसू तेलामी (वर्ष 23) यांचा दिनांक 20 जुलै रोजी लोक बिरादरी प्रकल्प दवाखाना, हेमलकसा ता. भामरागड येथे मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी सदर मयत इसम आंध्रप्रदेश येथे एका कंपनीत काम करीत होता. आशा स्वयंसेविका व नागरिकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे सदर मयत गणेश लालसु तेलामी हा सन 2022 च्या दिवाळीच्या आसपास कृष्णार येथे आला होता व अनियमितरीत्या अधूनमधून कृष्णार येथे एक ते दोन दिवसांकरिता येत होता. अशी माहिती मिळाली. सदर मयत व्यक्ती हा मृत्यूपूर्वी बांडेनगर ता. भामरागड येथे पुजाऱ्याच्या घरी काही दिवस वास्तव्यास व घरगुती उपचारासाठी होता. अचानक पोट दुखणे व संडासाची लक्षणे घेऊन तो लोकबिरादरी प्रकल्प दवाखाना येथे दि. 17 जुलै 2023 रोजी भरती झाला व तिथे त्याचे 19 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान क्षयरोगाचे निदान झाले. तेव्हापासून त्याचे उपचार सुरू होते. 20 जुलै रोजी सकाळी 11:40 वाजता गणेश लालसू तेलामी यांचा आकस्मिक मृत्यू झाला.

दि. 19 जुलै 2023 रोजी हेमलकसा ते भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला होता. दि. 20 जुलै रोजी सकाळी पुलावरून पाणी कमी होऊन वाहतूक सुरू झाली. पुन्हा पावसामुळे पूर परिस्थितीची वेळ व पुलावरून पाणी वाहण्याचे चिन्ह होते. मोबाईल कव्हरेज अनियमित असल्याने व गाडी कुठून मिळणार? याचे ज्ञान नसल्याने मयताचे नातेवाईक कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी प्रेत खाटेवर न्यायचे ठरविले.

परंतु पोलीस स्टेशन, भामरागड जवळ पोलीस प्रशासनाने त्यांना थांबविले व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ भामरागड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देऊन सदर मयत गणेशसाठी शववाहिका/ स्वर्गरथ पुरविण्याची सूचना केली. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तात्काळ शववाहिका त्या ठिकाणी दुपारी अंदाजे 1.15 वाजता पोहोचली. पोलिसांनी थांबविलेल्या ठिकाणापासून मयत गणेश तेलामी यास दुचाकीवर बांधलेल्या खाटेवरून शववाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, भामरागड येथे नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर मयताचे नातेवाईकांची बयान व नोंद घेऊन तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्याला परत शववाहिकेद्वारे त्यांच्या राहत्या घरी भामरागड वरून कृष्णार येथे नेऊन सोडल्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांनी केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संख्येत २०० वाढीव प्रस्तावाला मंजूरी घ्या - डॉ. नितीन राऊत

Fri Jul 28 , 2023
– राज्य सरकार मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात; विद्यमान सरकारवर खोचक टीका मुंबई/नागपूर :-राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे शिंदे सरकार ने राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संख्येत वाढीव प्रस्तावाला नामंजूर केले आहे. ज्यामुळे आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!