महाराष्ट्र राज्य स्टार्टअप सप्ताहाचा राजभवन येथे शानदार समारोप

अर्थ विभागाने स्टार्टअप्सना उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

प्रत्येक स्टार्टअप योजनेला आर्थिक पाठबळ देणार : देवेंद्र फडणवीस

स्टार्टअप उभारणी कार्याला लोक चळवळीचे रूप देणार : मंगलप्रभात लोढा 

स्टार्टअप्स कंपन्यांनी सर्वसमावेशक नाविन्यतेचा ध्यास घ्यावा : डॉ रघुनाथ माशेलकर

मुंबई :-  गेल्या आठ वर्षात देशामध्ये नाविन्यतेचा विशेषत्वाने पुरस्कार केल्या जात असून स्टार्टअप्सना चालना देण्यात येत आहे. अश्यावेळी युवकांनी स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास बाळगत वाटचाल केल्यास शंभर कोटी व त्यावरची उलाढाल असणाऱ्या अनेक युनिकॉर्न कंपन्या राज्यात निर्माण होतील असे सांगताना राज्याच्या अर्थ विभागाने स्टार्टअप्सना उभारणीसाठी आर्थिक सहकार्य करावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केली.       महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ २०२२ तसेच ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ विजेता सन्मान सोहळा राज्यपाल कोश्यारी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. १६) राजभवन येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

भौगोलिक मानांकनामुळे जळगावची केळी तसेच इतर कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज मोठे मूल्य मिळत आहे असे सांगून किसान रेल्वेमुळे कृषी उत्पादन शेतीपासून थेट बाजारापर्यंत नेण्याची सोय केली जात आहे. देशाचा अमृतकाळ सुरु असून युवकांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून मातृभूमीसाठी समर्पण भावनेने कार्य करावे, असे आवाहन राज्यपालांनी सांगितले. 

प्रत्येक स्टार्टअप योजनेला आर्थिक पाठबळ देणार : देवेंद्र फडणवीस

देशातील ८०,००० स्टार्टअप्स पैकी ५०,००० एकट्या महाराष्ट्रातील आहे. तसेच १०० कोटी व अधिक भांडवल असणाऱ्या १०० युनिकॉर्न कंपन्यांपैकी २५ राज्यातील आहे, त्यामुळे महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी आहे असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले. राज्याचा अर्थमंत्री या नात्याने आपण प्रत्येक नवीन स्टार्टअप प्रस्तावाला आर्थिक पाठबळ देऊ, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

नावीन्यतेच्या माध्यमातून देशाला ५ ट्रिलियन डॉलर तसेच राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करता येईल असे सांगताना राज्यातील कल्याणकारी योजना तसेच सुशासन सुदूर भागात पोहोचविण्यासाठी प्रत्यक्ष राबविता येईल अशा नवसंकल्पनांचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यास एमबीबीएस डॉक्टर्स तयार होत नाही, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने वैद्यकीय सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने मार्ग काढल्या जाईल असे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व आयटीआयचा कायापालट करणार : मंगल प्रभात लोढा

राज्यात ८७५ औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यांचा कायापालट करून एक वर्षात त्या ठिकाणी नवनवे अभ्यासक्रम सुरु केले जातील असे कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. कौशल्य विकास संस्था मंत्रालयापासून बाहेर काढून स्टार्टअपना चालना देण्यासाठी लोक चळवळ उभारली जाईल असे लोढा यांनी सांगितले.

स्टार्टअप्स कंपन्यांनी सर्वसमावेशक नाविन्यतेचा ध्यास घ्यावा : डॉ. रघुनाथ माशेलकर

सन २०१८ साली स्टार्टअप धोरण आणणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य असून आज स्टार्टअप कंपन्या राज्याच्या लहान लहान शहरांमधून निर्माण होत आहेत असे ज्येष्ठ वैज्ञानिक व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मार्गदर्शक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.

भारतातील कंपन्यांनी आता इतरांचे अनुकरण न करता सर्वसमावेशक नावीन्यतेचा ध्यास घ्यावा असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजकांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ‘स्टार्टअप वीक स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

कार्यक्रमाला स्वीडनच्या मुंबईतील वाणिज्यदूत ॲना लेकवाल, कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य अधिकारी डॉ. रामास्वामी एन तसेच युवा उद्योजक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंचितांचे प्रश्न धसास लावणे हीच खरी कुमार शिराळकरांना श्रद्धांजली - डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी

Mon Oct 17 , 2022
नागपूर :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी केंद्रीय कमिटी सदस्य तसेच आदिवासींमधील कामांना सतत वाहून घेतलेले प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांचा श्रद्धांजली कार्यक्रम 15 ऑक्टोबरला हिंदी मोर भवन येथे घेण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले की कुमार शिराळकरांचा काळ हा स्वातंत्र्योत्तर काळात नवभारत बनवण्यासाठी होणाऱ्या आंदोलनांचा काळ होता. प्रामुख्याने दलित आदिवासी इतर मागासवर्गीय तसेच आर्थिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!