संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नागपूर शहरात 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे .या अधिवेशनात न्यायिक हक्कासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठया संख्येत मोर्चेकरी सहभागी होत आहेत.हे मोर्चेकरी अधिवेशनात सहभागी होण्याचे औचित्य साधून नागपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरातील विश्वविख्यात, वैभवसंपन्न ,शांतीशिल्प ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असल्याने ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला दररोज सकाळी 7 वाजेपासूनच मोर्चेकरांची मोठ्या संख्येत गर्दी उसळत आहे.
कर्मयोगी ऍड दादासाहेब कुंभारे परिसरातील 10 एकर जागेवर ड्रॅगन पॅलेस ची निर्मिती अत्यंत उच्च दर्जाच्या बांधकाम साहित्याने करण्यात आली असून शेकडो कुशल कामगारांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या या वास्तूला भेट देण्यासाठी आलेल्या अनुयायांसह मोर्चेकरानी या ड्रॅगन पॅलेस मध्ये स्थापित असलेले सहा फूट उंची व 864 किलो वजनाची अखंड चंदनाच्या लाकडापासून बनविण्यात आलेली तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला वंदन केले.तेव्हा एक शांततापूर्ण प्रार्थना केंद्र असल्याची अनुभूती घेतली. तळमजल्यावर असलेले वातानुकूलित सभागृह, वाचनालय , फोटो गॅलरी सह मोठ्या विशाल अश्या प्रार्थनागृहाला भेटी देत पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार छताला निळ्या रंगाच्या इटालियन काचा ,अत्यंत शुभ्र संगमरवरात साकारलेले मंच आदी पाहून मनमोहक झाले तसेच जपानी स्थापत्य शैलीत बांधलेले हे ड्रॅगन पॅलेस टेम्पल एकमेव धार्मिक स्थळ असल्याचे समाधान व्यक्त केले तसेच याच परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र तसेच विपश्यना केंद्राला ही भेट दिली.