– राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :- खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोणत्याही परिस्थितीत खेळांची मैदाने केवळ खेळांसाठीच वापरण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते)चे सचिव सदाशिव साळुंखे, क्रीडा विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), नियोजन विभागाचे सहसचिव दीपक देसाई, महसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकम, नगरविकास विभागाचे सहसचिव निर्मलकुमार चौधरी, विधी व न्याय विभागाच्या उपसचिव मनिषा कदम, मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र कटकधोंड, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, सहसचिव दीपक पाटील,खजिनदार अरमान मल्लिक, कार्यकारी सचिव सी. एस. नाईक, सदस्य संदीप विचारे, प्रमोद यादव आणि महाव्यवस्थापक किंजल पटेल आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबईतील आझाद मैदान, ओव्हल मैदान व क्रॉस मैदान ही सर्व खेळांसाठी महत्त्वाची मैदाने आहेत. या मैदानांवर हजारो क्रीडापटू रोज विविध क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षणासह खेळाचा सराव करत असतात. या तिन्ही मैदानाची मालकी महसूल विभागाची आहे. क्रीडा विभागामार्फत ती खेळाच्या क्लबला भाडेपट्टा कराराने देण्यात येतात. सध्या या तिन्ही मैदानांवरील भूखंडांवर साठहून अधिक क्लब खेळाडूंना प्रशिक्षणाच्या व सरावाच्या सुविधा देतात. या क्लबचा भाडेपट्टा करार संपला असून तो पुन्हा करण्यासाठी महसूल विभाग, क्रीडा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने एक स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करावे. हे नव्याने तयार करण्यात येणारे धोरण मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास या चारही विभागांनी विहित वेळेत भाडेपट्टा करारासाठीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तसेच आझाद मैदान, ओव्हल मैदान व क्रॉस मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे व चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही स्वच्छतागृहे अत्याधुनिक करताना खेळाच्या सरावाला बाधा येऊ नयेत, तसेच मैदानाचे सौंदर्य खराब होऊ नये याची दक्षता घेत ती मैदानाच्या एका कोपऱ्यात उभारण्यात यावीत. कोणत्याही परिस्थितीत खेळाच्या मैदानांचा वापर केवळ खेळांसाठीच व्हावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.