चितार ओळी मेट्रो स्टेशन पासून इतवारी, महाल बाजरपेठ मध्ये पोहोचणे झाले शक्य

नागपूर :- महामेट्रोने नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच मेट्रो स्टेशन उभारले आहे. शहरातील अतिशय व्यस्त आणि गर्दीचे ठिकाण म्हणजे सीए रोड या ठिकाणी शहरातील इतर भागातील लोक या ठिकाणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येत असतात. या ठिकाणी धान्य, कपडे,ज्वेलरीची मोठी बाजारपेठ असल्याने तसेच या परिसरात आता मेट्रो सेवा सुरु झाल्याने मेट्रोने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. नागरिक आता मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत आहे.

उल्लेखनीय आहे कि, गणेशोत्सव नागपुरातील घराघरात उत्साहात साजरा केला जातो. गणेश मूर्ती खरेदीसाठी चितार ओळी परिसरात भाविक मोठ्या संख्येने वाहने घेऊन येतात. गणेश भक्तांसाठी देखील चितार ओळी स्टेशन आता फायदयाचे ठरणार आहे . या स्टेशनपासून इतवारी, महाल बाजारपेठही नजिकच असल्याने शहराच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना गणेश मूर्तीसह घरात आवश्यक दैनंदिन गरजेचे साहित्य खरेदीसाठीही मोठी सुविधा निर्माण झाली आहे. सिताबर्डी ते प्रजापतीनगर या रिच-४ मेट्रो मार्गिकेवरील (सेंट्रल एव्हेन्यू) चितार ओळी हे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवरून इतवारी, महालसारख्या बाजारपेठेत नागरिकांना जाता येते. चितार ओळी महाल लागूनच असलेले क्षेत्र असून परिसरात मूर्तीकारांची मोठी संख्या आहे. गणेश मूर्ती, दुर्गा मूर्ती येथे तयार केली जाते. येथूनच संपूर्ण शहरात मातीच्या मूर्ती खरेदी करून नेल्या जातात. त्यामुळे गणेशोत्सव, दुर्गोत्सवात येथे मूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

या भागात पूलक मंच परिवार असून परिवाराचे अध्यक्ष मनोज बंड यांनी नेहमीच मेट्रोतून प्रवासाचा आग्रह धरला. त्यांनी या परिसरात येणाऱ्या भाविकांना मेट्रोचे फायदे सांगितले. सिताबर्डी ते प्रजापतीनगर मेट्रो मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. चितार ओळीत गणेश मूर्ती खरेदीसाठी सिताबर्डीतीलच नव्हे तर उत्तर नागपूर, हिंगणा मार्ग, वर्धा मार्गावरील नागरिकांनाही आता थेट पोहोचता येणार आहे. याच मार्गावरील आणखी एक आकर्षक स्टेशन म्हणजे अग्रसेन चौक स्टेशन. या भागात आर्य समाज मंदिर असून शहरातील विविध भागातून लोक येथे येत. याशिवाय बाजूलाच इतवारी हा विदर्भातील सर्वात मोठा बाजार आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. येथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अग्रसेन चौक स्टेशन एक उत्तम पर्वणीच आहे. या भागातील आर्य समाज नागपूरचे अध्यक्ष उमेश तिवारी यांनी नेहमीच नागरिकांना मेट्रोतून प्रवासासाठी प्रोत्साहन देत असतात. त्यांनी समाजातील लोकांना मेट्रोतून सुखद, आरामदायी व माफक दरात प्रवासाचे फायदे सांगितले. शहरातील प्रत्येकच नागरिकांसाठी चितार ओळी व अग्रसेन चौक मेट्रो स्टेशन लाभदायी ठरणार आहे.

पिलरवर साकारली शहराची संस्कृती

पोळ्याच्या पाडव्याला शहरातून निघणारी मारबत संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. या मारबतीला इतिहास असून आता ती शहराच्या संस्कृतीचा भाग झाली आहे. चितार ओळी चौक स्टेशनजवळील दोन पिलरवर मेट्रोने नागपूरची मारबत साकारली आहे. मारबत उत्सवातील काली मारबत व पिवळ्या मारबतीचे म्युरल्स तयार करण्यात आले असून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांच्या संकल्पनेतून या चौकातील स्टेशनला मारबत म्युरल्समुळे वेगळाच लूक आला आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com