नागपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री व माजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई येथे माध्यमांना मुलाखत देताना, “सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे” असे अत्यंत आक्षेपार्ह, ज्या सनातन धर्माने जगभराला विश्वबंधुत्व, विश्वशांतीची शिकवण दिली अशा समस्त सनातन धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले. सप्टेंबर 2023 महिन्यात, तमिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री, उदयनिधी स्टॅलिन, यांनी सनातन धर्माबाबत द्वेषपूर्ण , अयोग्य वक्तव्य केले त्यांना समर्थन देत महाराष्ट्रातील पत्रकार निखील वागळे यांनीही “उदयनिधी स्टॅलिनशी मी सहमत आहे. सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखाच आहे. उदाहरण हवं असेल तर याच धर्माची उत्पत्ती असलेल्या सनातन संस्थेकडे बघा” असे आपल्या पोस्ट मध्ये लिहिले.
ही सर्व वक्तव्य ‘हेट स्पीच’ अंतर्गत येणारी आहेत आणि अतिशय गंभीर अशी आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अशा प्रकरणात त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारची, अन्य कोणी व्यक्तीने तक्रार दाखल करण्याची वाट न पाहता सरकारने स्वतःच दखल घेऊन FIR दाखल केली पाहिजे असे स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीही इतके दिवस उलटूनही वरील व्यक्तींविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
ही वक्तव्ये म्हणजे हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. त्यामुळे या व्यक्तींवर तत्काळ गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस स्टेशन, सीताबर्डी येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिकांतर्फे तक्रार दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी तक्रारीची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हिंदू जनजागृती समिती, छत्रपती विचार मंच, सार्थक संस्था, चित्पावन ब्राह्मण संघ, सनातन संस्था, हिंदू जागरण समिती, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, ग्रो ग्रीन आदी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.