संदीप कांबळे, कामठी
समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या रासेयो विशेष समाजकार्य ग्रामीण शिबिराचा समारोप
कामठी ता प्र 2:- भारत हा खेड्यांचा देश आहे. खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच देशाचा खरा विकास आहे. देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये आधुनिक समाज घडविण्याच्या क्षमता विकसित करण्याचे कार्य समाजकार्य शिबिराद्वारे केले जाते. त्यामुळे समाजकार्य शिबिरे ही ख-या अर्थाने आधुनिक समाजनिर्मितीची जणू कार्यशाळाच आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व कुलसचिव व ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी केले.भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी स्थापित केलेल्या रॅक हॉस्पिटलच्या निसर्गरम्य परिसरात, ग्राम कोंडासावळी,तालुका पारशिवनी येथे समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत सात दिवसीय विशेष समाजकार्य ग्रामीण शिबिर आयोजित करण्यात आले होते. नुकताच या सात दिवसीय शिबिराचा समारोप झाला. या प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.
समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांची उपस्थिती लाभली होती. प्राचार्य डॉ.रूबीना अन्सारी, पालासावळी गट ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र ठाकूर, गोसेखुर्द आंदोलनाचे प्रणेते विलास भोंगाडे, रॅक हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पंचबुद्धे, शिबिर समन्वयक व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत डांगे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. सविता चिवंडे, प्रा. राम बुटके मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज या महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रा. शशिकांत डांगे यांनी प्रास्ताविक भाषणातून सात दिवसीय विशेष समाजकार्य शिबिरात राबविलेल्या विविध कार्यक्रम, उपक्रमाची माहिती देऊन शिबिर आयोजनामागची भूमिका विशद केली. शिबिरादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती, रक्तदान, देहदान, अवयवदान, सांप्रदायिक सदभावना इत्यादी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने व शिबिरार्थी विद्यार्थ्यांद्वारे प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांचा समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. उदय बोधनकर यांनी गावकऱ्यांना लहान मुलांच्या आरोग्याबद्दल मौलिक व मूलभूत माहिती दिली. मोबाईलच्या अतिवापरामुळे व बाहेरील खानपानामुळे लहान मुले व तरुणांचे आरोग्य कशी धोक्यात आले याविषयी त्यांनी आपल्या रंजक शैलीत माहिती दिली.
डॉ. पुरणचंद्र मेश्राम म्हणाले ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कामठी येथे समाजकार्य महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रशिक्षित समाजकार्यकर्त्याची भावी पिढी घडविणारे विद्यार्थी आम्ही घडवीत आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी कुठलाही न्यूनगंड न बाळगता मोठ्या आत्मविश्वासाने वर्तमान परिस्थितीचा सामना केला पाहिजे. आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती नाही. विद्या आणि आत्मविश्वास यांच्या बळावर आपण यशाचे मोठमोठे शिखर पादाक्रांत करू शकतो. असेही ते म्हणाले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. रूबीना अन्सारी, सरपंच राजेंद्र ठाकूर, शिबिरार्थी कु. पल्लवी खंडाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शशिकांत डांगे यांनी केले, संचालन प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. सविता चिवंडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिबिरार्थी विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.