दिनेश दमाहे,मुख्य संपादक
– भूसंपादनाच्या मोबदल्याचा आढावा
नागपूर, दि. 28 : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी तसेच भूसंपादनाच्या मोबदल्याच्या प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगाव यथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. विमला, सहाय्यक आयुक्त हरीश भामरे, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार, संचालक डॉ. संजय कुमार, सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्यासह संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
वेकोलिच्या खाणींसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना उत्पन्नाचे दुसरे ठोस साधन नसल्याने त्यांना जमिनीचा मोबदला, पात्र वारसांना नोकरी देण्याची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढावीत. यासाठी वेकोलिकडे प्राप्त अर्जांमध्ये असलेल्या त्रुटींची त्वरित पूर्तता करून संबंधितांना लाभ द्यावा. ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांनी अद्याप मोबदला व नोकरीसाठी अर्ज केलेले नाहीत, त्यांची गावनिहाय यादी तयार करावी, त्यामध्ये अर्ज सादर न करण्याबाबतची कारणेही नमूद करावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव मोबदल्याबाबत आदेश पारित केलेल्या प्रकरणांमध्येही आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे केदार यावेळी म्हणाले.
कोटोडी व ऐरणगावमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने वेकोलिने याबाबत पर्यायी उपाययोजना करावी. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याच्या सूचना केदार यांनी दिल्या. भूसंपादन केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यामध्ये वेकोलिला काही अडचणी असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवून त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपविभागीय अधिकारी म्हेत्रे, तहसीलदार वाघमारे यांनी उपरोक्त तिन्ही गावातील भूसंपादन मोबदल्याच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली.