नागपूर :- नागपूर येथील विधानमंडळ वास्तुच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालय, नागपूर मौजा सिताबर्डी येथील 9670 चौ.मी. जागा विधानमंडळास उपलब्ध करुन देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यमान हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी आज आपल्या दालनात बोलवलेल्या सर्व संबंधितांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. विधान भवन, नागपूर येथे मध्यवर्ती सभागृहाची सुविधा नाही, त्यामुळे मा.राज्यपाल महोदयांचे अभिभाषण तसेच दोन्ही सभागृहांच्या सन्माननीय सदस्यांसाठी एकत्रितरित्या आयोजित करावयाचे कार्यक्रम यासंदर्भात अडचण निर्माण होते. या सर्व बाबी विचारात घेता विधानसभा अध्यक्ष यांनी मागील काळापासून शासन स्तरावर निर्णयासाठी प्रलंबित असलेल्या या प्रश्नी लक्ष घालून ही जमीन विधानमंडळाकडे हस्तांतरीत होण्यासाठी कार्यवाही सुरु केली होती. त्यासंदर्भात आज पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रधान सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग (उद्योग), महाराष्ट्र शासन ; विभागीय आयुक्त, नागपूर तसेच जिल्हाधिकारी, नागपूर यांची बैठक अध्यक्ष महोदयांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात उपरोक्त निदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले.
शासकीय मुद्रणालयाची जागा महाराष्ट्र विधानमंडळास हस्तांतरीत करण्याकरिता दिनांक 22 डिसेंबर, 2022 रोजी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी जिल्हाधिकारी, नागपूर यांना प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकारी, नागपूर यांनी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे प्रकरण सुपुर्द केल्यानंतर विभागीय आयुक्त, नागपूर यांनी अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांना दिनांक 30 जून, 2023 रोजी मंजूरीकरीत प्रस्ताव पाठविला. सदरहू मालमत्ता शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारित येत असल्याने महसूल विभागाकडून संबंधित नस्ती निर्णयासाठी उद्योग विभागाकडे पाठविण्यात आली असून निर्णयासाठी प्रलंबित आहे.