अभिरूप युवा संसदेच्या माध्यमातून देशाला विविध क्षेत्रात चांगले नेतृत्व मिळेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई :- संसदीय लोकशाहीच्या कार्यान्वयनात युवकांनी सहभाग घ्यावा या दृष्टीने सुरु केलेल्या अभिरूप संसद उपक्रमाच्या माध्यमातून देशाला परिपूर्ण नागरिक, उत्तम लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रात चांगले नेतृत्व लाभेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
नेहरू युवा केंद्र संघटनेच्या महाराष्ट्र व गोवा शाखेने युनिसेफ महाराष्ट्राच्या सहकार्याने मंगळवारी आयोजित केलेल्या पाहिल्या राज्यस्तरीय युवा अभिरूप संसदेला संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे आयोजित या दोन दिवसांच्या अभिरूप युवा संसदेच्या उदघाटन सोहळ्याला नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, युनिसेफ महाराष्ट्राच्या संचालिका राजेश्वरी चंद्रशेखर, युनिसेफच्या माध्यम तज्ज्ञ स्वाती मोहापात्रा, राज्य सल्लागार तानाजी पाटील तसेच राज्याच्या सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे अभिरूप संसद सदस्य उपस्थित होते.
आजचे युवक उद्याचे लोकप्रतिनिधी व नेते आहेत. त्यामुळे युवावस्थेपासूनच त्यांनी अभिरूप संसदेच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीचे प्रशिक्षण घेणे उपयुक्त ठरेल. ज्या प्रमाणे व्यक्तिमत्व विकासासाठी ज्ञान, कौशल्ये आणि क्रीडा आवश्यक आहे तसेच लोकशाहीमध्ये नागरिकांना आपले अधिकार, कर्तव्ये व जबाबदारी यांची जाणीव असली पाहिजे. देशाला केवळ चांगले वैज्ञानिक मिळणे पुरेसे नाही तर सर्वच क्षेत्रात चांगले नेतृत्व आवश्यक असते असे सांगून युवकांनी पर्यावरण बदल व इतर जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी देखील सज्ज झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते अभिरूप मंत्रिमंडळातील युवा पंत्रप्रधान गिरीश घनश्याम पाटील, सभापती स्वप्नील दळवी, विरोधी पक्षनेती नॅन्सी पांडे तसेच युनिसेफचे अधिकारी स्वाती मोहापात्रा व तानाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ‘सोशल मीडिया फॉर युथस’ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.