महाराष्ट्रात 15 व्या विधानसभेत 70 पेक्षा अधिक नवीन चेहरे आमदार म्हणून निवडून आले आहे. या नव्या चेहऱ्यांनी विधानसभेत नवचैतन्य आणण्याची अपेक्षा आहे. या नव्या चेहऱ्यांवर त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी तर आहेच, परंतु एक कुशल आणि प्रभावी नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधीही आहे. मात्र, या जबाबदाऱ्या पूर्ण करताना त्यांना एका सक्षम पाठीशी उभ्या असणाऱ्या कार्यसंघाची गरज भासणार आहे, ज्यामध्ये स्वीय सहाय्यकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, आमदार म्हणून यशस्वी होण्यासाठी केवळ व्यक्तिमत्त्व नव्हे, तर त्यांच्या कार्यसंघाची क्षमता आणि तज्ज्ञता देखील महत्त्वाची ठरते. यामध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे आमदारांचा स्वीय सहाय्यक..! स्वीय सहाय्यक ही केवळ एक व्यक्ती नसून आमदारांचे संसदीय, मंत्रालयीन, आणि प्रशासकीय कार्यकौशल्य सुलभ करणारा आधारस्तंभ असतो. स्वीय सहाय्यक हा कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा पक्षाशी संबंधित नसतो. तो फक्त आणि फक्त आपल्या आमदाराच्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतो. हा दृष्टिकोन फक्त विधानसभेपुरता मर्यादित नाही तर सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्थेसाठीही महत्त्वाचा आहे.
# स्वीय सहाय्यक का महत्त्वाचा ?
आमदारांचा स्वीय सहाय्यक हा केवळ “कोणाचा परिचित” आहे किंवा “कोणत्या जातीचा आहे” यावर आधारित निवडला जात असेल, तर याचा थेट परिणाम आमदारांच्या कामकाजावर होतो. अनेकदा ही निवड जातीय किंवा राजकीय पूर्वग्रहांच्या आधारे होते, ज्यामुळे गुणवत्तेची पातळी घसरते. अशा चुकीच्या पद्धतींना आळा घालून स्वीय सहाय्यकांच्या निवडीत पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. आमदाराचे संसदीय कामकाज, मतदारसंघातील समस्या, प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि विकासकामांचा पाठपुरावा या साऱ्याची जबाबदारी प्रचंड मोठी आहेत. स्वीय सहाय्यक हा या सर्वांमध्ये समन्वय साधणारा, मार्गदर्शन करणारा, आणि कामकाज सुलभ करणारा महत्त्वाचा घटक असतो. तो फक्त सहाय्यक नसून, आमदाराचा उजवा हात मानला जातो. संसदीय कामकाजामध्ये जसे प्रश्न मांडणे, विधेयकांवर चर्चा करण्यासाठी तयारी करणे, आकडेवारी तयार करणे आणि मंत्रालयीन फेऱ्या मारणे यासाठी एक कुशल सहाय्यकाची गरज असते. जर स्वीय सहाय्यक सक्षम नसेल, तर आमदाराच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळेच स्वीय सहाय्यकाची निवड हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. अनेकदा आमदार त्यांच्या स्वीय सहाय्यकाची निवड जातीय, धार्मिक, किंवा ओळखीतून करतात. काही ठिकाणी, “आपल्या माणसाला काम द्यायचे” या मानसिकतेमुळे निवडीत गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम असा होतो की, स्वीय सहाय्यकाच्या अपुऱ्या कौशल्यामुळे कामात अडथळे येतात आणि मतदारांपर्यंत योग्य सेवा पोहोचत नाही. अशी चुकीची निवड फक्त आमदारालाच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाला अडचणीत आणते. त्यामुळे निवड करताना एक गोष्ट ठळकपणे लक्षात ठेवावी – सक्षमता आणि कामाची योग्यता हाच एकमेव निकष असावा.
# काय पहावे स्वीय सहाय्यक निवडताना ?
स्वीय सहाय्यक हा आमदारांच्या कर्तव्यास पूरक असावा, यासाठी पुढील गोष्टींवर भर दिला पाहिजे:
1. संसदीय ज्ञान: विधिमंडळाच्या कामकाजाची तांत्रिक माहिती असलेला सहाय्यक आमदाराला प्रभावी ठरतो. प्रश्न तयार करणे, विधेयकांवरील चर्चा आणि प्रशासनाशी समन्वय साधणे.
2. मंत्रालयीन कौशल्य: प्रस्ताव मांडणे, मंत्रालयीन पत्रव्यवहार हाताळणे आणि प्रशासकीय गोष्टींची जाण असणे आवश्यक आहे.
3. समस्या सोडवण्याची क्षमता: मतदारसंघातील तक्रारी सोडवण्यात तज्ज्ञता असणे महत्त्वाचे.
4. कामाचा अनुभव: अनुभव हा नेहमीच महत्त्वाचा घटक ठरतो, पण तो गुणवत्तेच्या आड येता कामा नये.
5. संवेदनशीलता आणि नीतिमत्ता: जात, धर्म, पंथ किंवा राजकीय ओळख न पाहता, प्रत्येक मतदाराला समान न्याय देण्याची वृत्ती.
6. मतदारसंघातील तक्रारींचे व्यवस्थापन: मतदारांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरीत उपाययोजना करण्याची क्षमता.
# आमदारांसाठी संदेश :-
नवीन आमदारांनी स्वीय सहाय्यकांची निवड करताना, त्यांनी त्यांच्या आधीच्या कामाचा फक्त “कोणत्या आमदारांसाठी काम केले आहे” हा विचार न करता, त्यांच्या तांत्रिक आणि प्रशासकीय कौशल्यांवर भर दिला पाहिजे. एका दर्जेदार स्वीय सहाय्यकामुळे आमदारांचे कार्यक्षेत्र प्रभावीपणे वाढू शकते. नवीन आमदारांनी स्वीय सहाय्यक निवडताना पारंपरिक पद्धतींना तिलांजली देऊन, आधुनिक आणि गुणात्मक दृष्टिकोन स्वीकारावा. कोणत्या जातीचा, धर्माचा, किंवा कोणत्या आमदारांसोबत त्यांनी आधी काम केले आहे यापेक्षा, स्वीय सहाय्यकाच्या ज्ञानाला आणि कौशल्याला अधिक महत्त्व द्यावे. जर प्रत्येक आमदार गुणवत्तेच्या आधारावर सहाय्यकाची निवड करत असेल, तर केवळ त्यांचेच काम सुलभ होणार नाही, तर संपूर्ण विधिमंडळाच्या कामकाजाचा दर्जाही उंचावेल.
# संकल्पनेतून क्रांतीकडे :-
स्वीय सहाय्यकाची निवड ही केवळ जबाबदारी नव्हे, तर आमदारांसाठी एक संधीही आहे. त्यांनी एक सक्षम स्वीय सहाय्यकाची निवड करून आपल्या कार्यक्षेत्राचा परीघ विस्तारावा. यातून फक्त आमदाराचीच नाही, तर संपूर्ण मतदारसंघाची प्रगती साधता येईल. स्वीय सहाय्यक हा आमदाराच्या कर्तव्याशी निष्ठावान असतो; तो कोणत्याही जाती, धर्म, किंवा पंथाशी नाही. या तत्त्वाचा स्वीकार करणाऱ्या आमदारांमुळे महाराष्ट्राचे विधिमंडळ अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख होईल, यात शंका नाही.
# निष्कर्ष :-
स्वीय सहाय्यक हा फक्त एक सहायक नसून, आमदाराच्या कार्यक्षमता वृद्धिंगत करणारा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जात, धर्म, पक्ष, किंवा ओळखींपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिल्यास एक सक्षम कार्यसंघ उभा राहील, ज्यामुळे केवळ आमदार नव्हे, तर मतदारसंघाचाही सर्वांगीण विकास साधता येईल. संपूर्ण राज्याच्या प्रशासनात सकारात्मक बदल घडवता येतील. विधायक दृष्टिकोनातून हा विषय स्वीकारला तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाईल. “स्वीय सहाय्यक हा केवळ कर्तव्याशी एकनिष्ठ असतो.” याच तत्त्वावर आधारित निवडीमुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळात एका नव्या युगाची सुरुवात होऊ शकते.