नागपूर :- नागपूर जिल्हयात येत्या ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार असून या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून शिक्षण विभाग व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने सुमारे ५१९४०७ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे आदी आजारांचा धोका उद्भवतो. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी केले आहे.
जिल्हयातील आरोग्य विभागाने राष्ट्रीय जंतनाशक दिनाची तयारी केली असून, तालुका आरेाग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हयतील २५०१ अंगणवाडी केंद्रे, २०५९ शाळा व महाविद्यालयांमध्ये सुमारे ५१९४०७ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. काही कारणास्तव ४ डिसेंबरला ज्या बालकांना जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा वंचित सर्व बालकांना १० डिसेंबरला मॉप-अप दिनी ही गोळी देण्यात येणार आहे.
जंतामुळे मुलांमध्ये ॲनिमिया , पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा मुलांना धोका असतो. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाकडून वर्षातुन सहा महिन्याच्या अंतराने दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. या मोहिमेदरम्यान १ ते १९ वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किंवा पाण्यात विरघळून दिली जाते.
केंद्र सरकारच्या व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जंतनाशक दिनी १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. २ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.
बालकांच्या आरोग्याविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४ वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करुन रुग्णवाहिका मागवू शकतात.
शासकीय रुग्णालयात देखील मिळणार मोफत गोळी – अल्बेंडाझोल ही गोळी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जाणार आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.
सदरील कार्यक्रमाचे नियोजन डॉ.विपीन ईटनकर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्गदर्शनाखालील राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम यशस्वी करण्याकारीता महिला व बालकल्याण विभाग,आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, डॉ.यश बनाईत इंडीयन असोशियशन बालरोग तज्ञ ,जिल्हा शल्य चिकित्सक , शिक्षण अधिकारी माध्यमीक, प्राथमिक, यांचे सहकार्य लाभाणार असुन आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर कटिबध्द आहे.