– ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा पत्रकार परिषदेतून करडा इशारा : सैय्यद अझीमपीर खादरीविरुद्ध करणार पोलिस तक्रार
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इस्लाम धर्म स्वीकारणार होते, असे ‘खोटे कथानक’ कर्नाटक राज्याचे चे माजी आमदार आणि काँग्रेस नेते सैय्यद अझीमपीर खादरी यांच्या माध्यमातून काँग्रेसकडून पसरविले जात आहे. अशा पद्धतीचे ‘खोटे कथानक’ कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा करडा इशारा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
कर्नाटक काँग्रेसचे नेते माजी आमदार सैय्यद अझीमपीर खादरी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचा ॲड. मेश्राम यांनी पत्रकार परिषदेमध्ये तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. रामदासपेठ येथील भारतीय जनता पक्षाच्या मीडिया हाऊस येथे गुरूवारी (ता.१४) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सूरज केरो, प्रवक्ते चंदन गोस्वामी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. राहुल झांबरे, अनुसूचित जाती मोर्चा शहर महामंत्री शंकर मेश्राम व महेंद्र प्रधान उपस्थित होते.
कर्नाटकमध्ये शिगगाव येथील आदि जांबवा येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी आमदार असलेले काँग्रेसचे नेते सैय्यद अझीमपीर खादरी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करताना म्हणाले, ‘आंबेडकरांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा विचार केला होता. मात्र त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असता तर आज आमचे दलित नेते थिम्मापुर मध्ये रहीम, परमेश्वर पीर, हनुमंतैया हसन आणि मंजूनाथ महबूब असते.
दलितांच्या वस्त्या नेहमीच मुस्लीम दर्ग्याच्या आजुबाजूला असतात.’ या वक्तव्याचा समाचार घेत ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी काँग्रेसला जर सामाजिक सलोखा कायम ठेवायचा नसेल आणि बाबासाहेबांचा अशा पद्धतीने आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा असेल तर ही इस्लामिक आक्रांतवादी प्रवृत्ती बिलकुल खपवून घेतली जाणार नाही, असा सक्त इशारा ॲड. मेश्राम यांनी दिला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या सैय्यद अझीमपीर खादरी यांच्या वक्तव्याबाबत मूग गिळून गप्प असलेले काँग्रेसचे नेते, संविधानाची कोरी पुस्तिका घेऊन फिरणारे राहुल गांधी, कर्नाटक राज्यातील दलित चेहरा असलेले कांग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि महाराष्ट्रातील नेते नाना पटोले यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम पत्रकार परिषदेतून केले.
अझीमपीर खादरी यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून त्यांच्या विरुद्ध पोलिस तक्रार तसेच केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे आमचे कार्यकर्ते तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांच्या धर्मांतराबाबत ॲड. मेश्राम यांनी अनेक दाखले दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची घोषणा केली. यानंतर त्यांनी ३० मे १९३६ साली मुंबई येथे “महार सभा” सुद्धा घेतली. यानंतर बाबासाहेबांनी जगातील अनेक धर्मांचा अभ्यास केला. बाबासाहेबांना अनेक धर्मांनी त्यांच्या धर्म स्वीकारावा यासाठी आमीष देखील दाखविले गेले. यात इस्लाम धर्म देखील होता. पण बाबासाहेबांनी प्रज्ञा, शील व करुणा आणि समता ही बुद्धांनी सांगितलेली तत्व जीवनाला पुढे नेतील हा विश्वास बाळगून आणि त्याचा अंगीकार करून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
बाबासाहेबांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मापेक्षा बौद्ध धर्म निवडला होता कारण ते या धर्मांना परदेशी मानत होते. ‘इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने नैराश्यग्रस्त वर्गाचे राष्ट्रीयकरण होईल,’ असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. ‘पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात बाबासाहेबांनी म्हटले आहे की, ‘हिंदू धर्म लोकांना विभाजित करतो आणि याउलट इस्लाम लोकांना एकत्र बांधतो असे म्हटले जाते. हे केवळ अर्धसत्य आहे. कारण इस्लामचा बंधुत्व हा मानवाचा वैश्विक बंधुत्व नाही.
यापुढेही बाबासाहेबांनी स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या अनुसूचित जातीतील लोकांवर धर्मांतरासाठी होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उचलला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २७ नोव्हेंबर १९४७ ला पाकिस्तानातील अनुसूचित जातीच्या लोकांना भारतात येण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारू नये असे लेखी आवाहन केले होते. हे आवाहन करताना त्यांनी ज्यांचे बळजबरीने धर्मांतरण झाले ते जर भारतात परत येण्यास इच्छूक असतील तर त्यांना पुन्हा आपल्या धर्मात सामील करून त्यांच्यासोबत बंधूभावाने आधीसारखे व्यवहार करण्यात येईल, याची शास्वती देखील दिली होती, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
हे सर्व नमूद असतानाही जाणीवपूर्वक बाबासाहेबांना इस्लाम धर्माचा स्वीकार करणार असल्याचे सांगून बाबासाहेब आणि तथागत भगवान बुद्धांची प्रतिमा कलुषीत करण्यात येत असल्याचे ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले. खादरी यांच्यासारख्या नेत्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसला देशात सर्वधर्मसमभाव नको आहे, हे स्पष्ट होत आहे. इस्लामचा इतिहास हा आक्रमणकारी आहे. त्यांना जगावर राज्य करायचे आहे आणि त्याच मानसिकतेतून आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने खोटे कथानक पसरवून समाजाची आणि देशाची दिशाभूल करण्यात येत आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी समाचार घेत खादरी आणि काँग्रेसचा निषेध नोंदविला. ही खोट्या कथानकाची भाषा भारतीय जनता पार्टी आणि आंबेडकरी अनुयायी कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी देखील पावले उचलण्यात येईल, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
सैय्यद अझीमपीर खादरी यांची चिखलफेक आणि त्यावर गप्प बसलेले ‘जय भिम-जय मीम’चा नारे तथाकथीत आंबेडकरवाद्यांचा चेहरा यानिमित्ताने उघडा पडला आहे, अशी टिकाही ॲड. मेश्राम यांनी केली. या तथाकथीत आंबेडकरवाद्यांनी स्वत:ही याबाबत स्पष्टीकरण द्यावे व काँग्रेसकडून देखील स्पष्टीकरण मागण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.