महाविकास आघाडी म्हणजे महाविनाश, महायुती म्हणजे विकास!

– दोंडाईचा येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल

धुळे :- गांधी कुटुंबाच्या चार पिढ्या आल्या तरी अनुसूचित जाती जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी दोंडाईचा (जि. धुळे) येथील प्रचंड जाहीर सभेत बोलताना दिला. महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या उलेमा संघटनेच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आश्वासनावरून शाह यांनी काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरले. महाविकास आघाडी म्हणजे विनाश, आणि महायुती म्हणजे विकास हे स्पष्ट झाले असल्याने महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या सभेला व्यासपीठावर सरकारसाहेब रावल, नयनकुंवर रावल, आ. अमरीश पटेल, डॉ. सुभाष भामरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महायुतीचे उमेदवार राजवर्धन कदमबांडे, सुभाष देवरे, महायुतीचे धुळे जिल्ह्यातील उमेदवार जयकुमार रावल, काशीराम पावरा, अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.

शाह यांनी सांगितले की, याच महाविकास आघाडीने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध केला, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीस विरोध केला, 370 कलम रद्द करण्यास विरोध केला आणि सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध केला. वक्फ कायद्याच्या मनमानीमुळे देशातील जनता त्रस्त आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर तेथील परिस्थिती देश अनुभवत असून गावेच्या गावे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे.

शेकडो वर्षे जुनी मंदिरे, शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि लोकांची राहती घरेदेखील बघता बघता वक्फ बोर्डाच्या मालकीची झाली आहेत. आता महाआघाडीवाले वक्फ कायद्यात सुधारणा करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयासही विरोध करत आहेत, त्यामुळे सावध रहा आणि काँग्रेस व आघाडीला सत्तेपासून दूर ठेवा असा इशाराही त्यांनी दिला. विनाश करणाऱ्यांच्या हाती राज्याची सत्ता द्यायची की विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महायुतीकडे सत्ता द्यायची याचा निर्णय मतदारांनी करावयाचा आहे, असे ते म्हणाले.

केवळ अयोध्येतील राम मंदिरच नव्हे, तर औरंगजेबाने तोडफोड केलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे कामही मोदी सरकारने पूर्ण केले, आणि सोमनाथाचे मंदिरही आता पूर्वीच्या सुवर्णवैभवाने झळाळी घेत आहे, हे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. येत्या तीन वर्षांत भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल याची ग्वाहीदेखील शाह यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली असून केवळ सत्तेसाठी ते काँग्रेस आघाडीसोबत गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अलीकडेच उलेमाच्या एका संघटनेने काँग्रेसला निवेदन देऊन महाराष्ट्रात मुसलमानांकरिता दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याचा अर्थ, अगोदरच 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलेल्या आरक्षणातून दलित, अल्पसंख्य आणि आदिवासींच्या आरक्षणात कपात करून हे आरक्षण द्यावे लागेल. भारतीय जनता पार्टी विधानसभेत व संसदेत आहे, तोवर हे आरक्षण मिळणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.

सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांच्या सत्ताकाळात पाकिस्तानातून दहशतवादी यायचे आणि बॉम्बस्फोट करून आरामात निघून जायचे, तेव्हा सरकार स्वस्थ बसत होते. मोदी सत्तेवर आल्यानंतर उरी व पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी ठोस कारवाई केली, दहा दिवसांत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. देशाच्या सुरक्षेला मोदी सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, लांगूलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या आघाडीवाल्यांनी मात्र, देशाच्या सुरक्षिततेलाच वेठीस धरले आहे, असे ते म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न काँग्रेसने, शरद पवारांनी सत्तर वर्षे लटकावत ठेवला. मोदींनी सत्तेवर येताच पाच वर्षांतच हा प्रश्न सोडविला, मंदिरही उभारले, आणि यंदा साडेपाचशे वर्षांनंतर रामलल्लाने आपल्या भव्य मंदिरात दीपावलीचा उत्सव साजरा केला. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राचे हित करू शकत नाही, मोदी सरकार केंद्रात आणि महायुतीचे सरकार महाराष्ट्रात असेल, तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत या आघाडीचा सुपडा साफ होणार आहे, असे विश्वासपूर्ण भाकितही शाह यांनी वर्तविले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ECO BRICKS WORKSHOP FOR NATURE CONSERVATION AT DPS MIHAN

Thu Nov 14 , 2024
Nagpur :- Delhi Public School MIHAN collaborated with Anviti, a city-based Civil Society Organization (CSO), to conduct an Eco Bricks workshop, educating students on sustainable practices and combating plastic pollution. The students were introduced to the concept of Reduce, Reuse, Recycle and Reject plastic bottles and were encouraged to adapt a sustainable life style.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 The Principal of DPS MIHAN Nidhi […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com