मुंबई :- विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत असतानाच भारतीय जनता पार्टी जनादेश मागताना लोकप्रबोधनही करणार असून त्यासाठी ‘नक्की काय चाललंय?’ हा पॉडकास्ट सुरू करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते व माजी खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे हे त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखतीद्वारे संवाद साधत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात देशात गेल्या साडेदहा आणि राज्यात गेल्या साडेसात वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा आणि भविष्यात काय करता येईल, याची विस्तृत चर्चा करणार आहेत. यासंदर्भात माहिती देण्यासाठी मीडिया सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला डॉ. सहस्रबुद्धे यांच्यासोबत मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान, किरीट भन्साळी उपस्थित होते. या पॉडकास्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी, ॲड. उज्ज्वल निकम, सदानंद मोरे आदींशी डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी बातचीत केली आहे.
हरियाणातील यशानंतर भाजपा संपूर्ण आत्मविश्वासाने महाराष्ट्रातील निवडणुकीला सामोरे जात आहे. आम्ही केलेल्या कामाच्या आधारावर मत द्या असे म्हणणारा, भाजपा वगळता एकही पक्ष देशात नाही. भाजपाची बूथ स्तरापासूनची असलेली बांधणी, भाजपा कार्यकर्त्यांचा घरोघर असलेला संपर्क, मतदारांशी असलेला समन्वय यासोबत समाज माध्यम तसेच नव्या माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. त्याचसोबत आता पॉडकास्टचाही समावेश करण्यात येणार असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.
या पॉडकास्टमध्ये ज्येष्ठ सरकारी वकील आणि विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांचीही मुलाखत आहे. त्यात ॲड. निकम यांनी नोकरशाही आणि पोलिस अधिकाऱ्यांचे काही वेगळे मत असतानाही 2016 मध्ये मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हेडली याला व्हर्चुअल साक्षीला बोलावण्यास तात्काळ मंजुरी दिल्याने त्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता हे जगासमोर ठळकपणे आणू शकलो, असे स्पष्ट केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्यक्तिमत्व पंतप्रधानपदी असल्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची खटपट सुफळ संपन्न झाल्याचे सांगितले. आदर्श गाव समितीचे सध्याचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी सर्वत्र भूजल स्तर कमी होत असताना महाराष्ट्रात तो टिकवणे आणि वाढवणे कसे शक्य झाले हे स्पष्ट केले आहे. याचबरोबर शेतकरी नेते पाशा पटेल यांनी शेती विषयात तर स्मृती इराणी यांनी महिला आणि बाल कल्याण विभागात काय घडलेय याची माहिती दिली आहे. दलित इंडस्ट्रीयल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्यासोबतही बातचीत करण्यात आल्याची माहिती ही डॉ. सहस्रबुद्धे यांनी दिली. राज्यातील सुजाण मतदार बंडखोरांना प्रतिसाद न देता महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करतील असा विश्वास डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केला.