तिर्थदर्शन योजनेद्वारे राज्यातील जनतेचे तिर्थयात्रेला जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

–  मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेच्या यात्री रेल्वेस उपमुख्यमंत्र्यांनी केले रवाना

– ‘चलो अयोध्ये’च्या जयघोषात 800 जेष्ठ नागरिक तिर्थदर्शनासाठी मार्गस्थ

नागपूर :- राज्यातील जनतेला विविध तिर्थक्षेत्राला भेट देण्याचे स्वप्न असते, ‘मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेद्वारे’ त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आल्याच्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील तिर्थयात्रेकरुंच्या रेल्वेस दुरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा देत रवाना केले.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत ‘गौरव भारत’ या विशेष रेल्वेने जवळपास 800 जेष्ठ नागरिक वाराणसी व अयोध्येसाठी मार्गस्थ झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलाटावर उपस्थित यात्रेकरु व मान्यवरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

तिर्थदर्शन योजनेंतर्गत तिर्थक्षेत्री निघालेल्या सर्व यात्रेकरुंचे अभिनंदन करत फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीरामचंद्र आणि काशिविश्वेश्वराचे दर्शन घडावे असे भाविकाचे स्वप्न असते. राज्य शासनाने मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना आणल्याने हे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. भाविकांना सुरक्षित व आनंददायी यात्रेसाठी शुभेच्छा देत त्यांनी या विशेष रेल्वेस रवाना केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि कृष्णा खोपडे, प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आदी यावेळी उपस्थित होते.

रेल्वे स्थानकावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण

यावेळी फलाटावर विविध फुलांच्या रांगोळया, ढोल-ताशे, ठिकठिकाणी स्वागताची फलके दिसून येत होती. गौरव भारत ही विशेष रेल्वे डौलात उभी होती. फुलांच्या माळा, फुगे आणि आकर्षक तावदाणांच्या सजावटीने ही यात्री रेल्वे अधिकच खुलून दिसत होती. यात्रेकरुंसाठी प्रशासनाकडून जलपाणाची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जेष्ठ नागरिकांच्या कपाळावर टिळे, गळयात तुळशीमाळा, मुखात रामनाम असे भक्तीमय वातावरण या विशेष रेल्वेच्या 14 ही डब्यांमध्‍ये दिसून आले. ही रेल्वे गोंदिया-जबलपुर मार्गे 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता वाराणसीला पोचेल तर याच दिवशी रात्री 8 वाजता अयोध्येला पोचेल. 13 ऑक्टोबर रोजी प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेवून यात्रेकरू त्याच रात्री 11.15 वाजता परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतील आणि 14 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता नागपूरला परतणार आहेत. सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे उसळला जनसागर

Fri Oct 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील शांती मार्च चे आयोजन कामठी :- दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लाखो अनुयायी देशाच्या काण्या कोपऱ्यातून भेट देत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एक आठवडा भर अनुयायांची अलोट गर्दी असते.ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाची पूर्व तयारी करण्यात आली असून भेट देणाऱ्या भावीकाकरिता आवश्यक ती सर्व नागरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com