मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

– मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाइन सोडत

मुंबई :- ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली.

यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

मंत्री सावे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून यातली अडीच लाख घर ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. आजच्या या लॉटरीसाठी दोन हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, शहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.

म्हाडामुळे मुंबईतील सर्वसामान्यांना घराचा दिलासा – पालकमंत्री दीपक केसरकर

म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. धारावी, बीडीडीचाळ यांच्या पुनर्विकासामुळे या भागातील नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून ही विकास करण्यात येत आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या की, आजची लॉटरी प्रणाली ही पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहित आहे. ही लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे झालेली आहे. म्हाडा म्हणजे विश्वास. म्हाडाचे घर मिळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला यावरूनच लोकांचा म्हाडावर किती विश्वास आहे हे लक्षात येते. एक स्थिर आणि सुरक्षित घर सर्वांचं स्वप्न आहे. या लॉटरी प्रक्रियेने ते स्वप्न पूर्ण होत आहे.

प्रास्ताविकात जयस्वाल म्हणाले, २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत करण्यात आली आहे. यासाठी अनामत रकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज पात्र होते. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये दुसऱ्यांदा लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार सदनिकांचे दरही कमी करण्यात आले आहेत.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले होते. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. या प्रकल्पात मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवारनगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार ३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.

जयश्री कोटकर आणि कृपाल पटेल या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पत्र यावेळी देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मिलिंद बोरीकर यांनी यावेळी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

Wed Oct 9 , 2024
मुंबई :- मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी आगमन झाले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com