– पूर्व नागपुरातील विविध कामांचे ना. गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण
नागपूर :- स्मार्ट सिटी असणाऱ्या नागपूर शहरात सर्वत्र विकास होत आहे. शैक्षणिक संस्था, आरोग्य विषयी सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, चांगले रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यामुळे शहर बदलत चालले आहे, अशात पूर्व नागपूरचा विकास देखील झपाट्याने होत आहे, स्मार्ट सिटीने पूर्व नागपूरचे चित्र बदलले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केले. ते नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व नागपूरातील विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
रविवारी(ता:6)केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते पूर्व नागपूरातील विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. पुनापूर पारडी येथे आयोजित कार्यक्रमात पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा खोपडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा-चांडक, सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद शेवाळे, मनपाच्या मुख्य अभियंता लिना उपाध्ये, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर यांच्यासह इतर मनाप व पोलीस अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पूर्व नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहे. परिणामी पूर्व नागपूरचे चित्र बदलले आहे. मागील दहा वर्षांमध्ये सर्वांत जास्त बदल पूर्व नागपूरमध्ये झाला आहे. या भागातील बहुतांश अडचणी दूर झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांना उत्तम सोयी सुविधा प्राप्त झाले आहेत परिणामी त्यांचे जीवन सुखर झाले आहे, हॅप्पी ह्युमन इंडेक्स मध्ये चांगली वाढ होत असल्याचे सांगत श्री. गडकरी यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य विषयी सोयीसुविधा मिळाव्या याकरिता तयार करण्यात आलेल्या रुग्णालयांना धर्मदाय आयुक्त यांच्या कडे नोंदणीकृत असलेल्या चांगल्या ट्रस्टला चालवायला द्यावे असे सूचित केले. तसेच नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर भर द्यावा, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या बसेस शहरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, याशिवाय विकासकांनी शहराला स्मार्ट व सुंदर साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही गडकरी यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करीत आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरच्या विकासाचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी लोकार्पण आणि भूमिपूजन झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तसेच विविध विकास कामांसाठी सरकार द्वारे भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे धन्यवाद दिले. तर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले की, पोलीस ठाण्याच्या इमारती स्मार्ट झाल्या असून, आता पोलीस आणखी स्मार्ट झाले झाले पाहिजे याकडे आमचा लक्ष राहणार आहे गुन्हा व गुन्हेगारावर चांगलाच वचक बसला असून, अपघात मुक्त शहर कसे होईल याकडे आपले लक्ष असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मनपा व स्मार्ट सिटी प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले.
विकास प्रकल्पासाठी अनिल सारडा प्रसन्न ढोक , मुरारी काबरा यांनी आपली जागा प्रशासनाला दिली आहे. यातील अनिल सारडा यांचा व हंसवाहिनी कन्स्ट्रक्शनचे देवेन पाडगल यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व आभार ही त्यांनीच व्यक्त केले. कार्यक्रमात मनपाचे अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी मनोज तलेवार, नागपूर स्मार्ट सिटीच्या भानुप्रिया ठाकूर,राजीव दुफारे, डॉ. शील घुले, डॉ. प्रणिता उमरेकर, ओम प्रकाश लांडे मोईन हसन, राज्य अनुसूचित जाती जमातीचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम माजी नगरसेवक दीपक वाडीभस्मे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आलेले प्रकल्प
– क्वेटा कॉलनीमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीमधून देवाडिया सूतिकागृहाची निर्मिती केली जाणार आहे. या सूतिकागृहामुळे स्थानिक वस्तींमधील जनतेला आरोग्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे.
– नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुनापूर येथे पोलीस स्टेशन बांधण्यात आले आहे पोलीस स्टेशनची इमारत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. पारडी,भरतवाडा पूनापूर भांडेवाडी नजीक क्षेत्रातील नागरिकांसह गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
– केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत अमृत योजना अंतर्गत नंदनवन कॉलनी मधील तसेच सिम्बायोसिस कॉलेज जवळील वाठोडा येथील प्रत्येकी २० लक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.दोन्ही पाण्याच्या टाकींची किंमत प्रत्येकी १ कोटी ९३ लक्ष रुपये एवढी आहे. तर लकडगंज प्रजापती नगर येथे १५ लक्ष लीटर क्षमतेच्या आणि १ कोटी ९९ लक्ष रुपये खर्चातून पाण्याची टाकी निर्माण करण्यात आली आहे.या तीनही पाण्याच्या टाकींमुळे नागपूर शहर टँकरमुक्त करून सर्व भागात २४ तास मुबलक प्रमाणात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या संकल्पनेची पूर्ती होत आहे. पाण्याच्या या तिनही टाक्यांमुळे परिसरातील हजारो घरांना लाभ मिळणार आहे. परिसरात असलेली पाण्याची समस्या यामुळे आता सुटणार आहे.
– नागपूर महानगरपालिकेच्या नंदग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे देखील वाठोडा येथे भूमिपूजन करण्यात आले. सन 2023-24 मध्ये नागपूर महानगरपालिका क्षेत्र मूलभूत सोयीसुविधांचा विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत नंदिग्राम प्रकल्पा त रुपये 104 कोटी मंजूर झाले आहे.या निधीतून नंदग्राम प्रकल्प साकारून शहरातील गवळी बांधव, गोपालकांना हक्काचे स्थान मिळणार आहे. शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर कमी करून त्यांना सुरक्षित स्थान मिळावे, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे.
– नागपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा अग्निशमन यंत्रणेवर वाढता ताण लक्षात घेऊन वाठोडा येथे नागपूर महानगरपालिकेद्वारे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. हे अग्निशमन केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी खुले झाले आहे. तसेच नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुनापूर येथे अग्निशमन केंद्राचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून तळमजल्यासह अधिक दोन मजले अशी अग्निशामन केंद्राची व्यवस्था आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान देखील येथे तयार करण्यात आले आहे. पूर्व नागपूर क्षेत्रातील पारडी भरतवाडा, पूनापूर, भांडेवाडी नजीकच्या क्षेत्रात ती नागरिकांना या नवीन अग्निशमन केंद्राचा फायदा होणार आहे.
– नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूनापूर येथे मल्टी स्किल डेव्हलपमेंट सेंटर तयार करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे बेरोजगार व शिक्षित अशिक्षित तरुणांना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
– नागपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याकरिता शहरात एकूण ११३ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर झालेले आहेत. यापैकी ३६ आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यान्वित असून, यापैकी पूर्व नागपुरातील चार आयुष्मान आरोग्य मंदिरांचे लोकार्पण झाले आहे. पूर्व नागपुरातील शहीद चौक येथील दाजी आयुष्मान आरोग्य मंदिर, लकडगंज आयुष्मान आरोग्य मंदिर, बाहुबली नगर आयुष्मान आरोग्य मंदिर आणि अन्नपूर्णा सोसायटी वैष्णोदेवी नगर आयुष्मान आरोग्य मंदिर या चार आयुष्मान केंद्रा स्थापन करण्यात आले आहे. तसेच शहरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकाच्या सुविधेसाठी कार्यान्वित करण्यात आलेले चार नवीन फिजिओथेरेपी सेंटरचे देखील करण्यात आले.
– सी अँड डी वेस्ट प्रकल्प: शासनाच्या स्वच्छ भारत मिशन एक अंतर्गत नागपूर शहरातील सी अँड डी वेस्ट गोळा करून वहन करून व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी 7.51 कोटीचा प्रकल्प मंजूर आहे त्यानुसार भांडेवाडी येथे पाच एकर जागेवर प्रकल्प तयार करण्यात येणार आहे.