आरक्षण विरोधी राहुल गांधींविरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन

– आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा

– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

नागपूर :-अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले. आरक्षण संपवणे ही काँग्रेसची सुप्त इच्छाच आहे. राहुल गांधी यांच्या ओठातून ही इच्छा व्यक्त झाली, अशा शब्दांत बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीआधी जातीय जनगणना, आदिवासी, दलित जनतेबद्दल कळवळा दाखवणा-या काँग्रेसची सामाजिक न्यायासंदर्भातली भूमिका किती दुटप्पी आहे हे राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने कायम लोकशाही, संविधानाची पायमल्ली केली असून आता काँग्रेसची मजल आरक्षण रद्द करण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत गेली आहे, असा घणाघातही बावनकुळे यांनी केला. जनतेमध्ये जाऊन याबाबत भाजपा प्रबोधन करेल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. राहुल गांधींच्या संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी वक्तव्याच्या विरोधात राज्यभर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. राज्यभरात ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत, नेहरू ते गांधी काँग्रेसी नेते आरक्षण विरोधी … बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही… अशा आशयाचे फलक घेऊन, हाताला काळ्या फिती बांधून भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.

अकोला येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी काळ्या फिती बांधून आंदोलनात भाग घेतला. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आ.मिहीर कोटेचा यांनी मुंबईतील घाटकोपर येथे आंदोलनातून काँग्रेसविरोधात एल्गार पुकारला. जो पर्यंत राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकावर जाऊन नाक रगडून माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच राज्यभर सुरू राहणार असा खणखणीत इशारा आ. आशीष शेलार यांनी दिला. राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार का बोलत नाहीत? असा सवालही आ. शेलार यांनी केला. काँग्रेसचा इतिहास बघता त्यांनी कायमच लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला या शब्दांत पंकजा मुंडे यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

या आंदोलनात ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, खा.स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे यांनी जळगावात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात , वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे, माजी खासदार व राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना गावीत, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी नंदुरबार येथे सहभाग घेतला. सोलापूर येथे आ. सुभाष देशमुख, सांगली येथे आ. सुधीर गाडगीळ, नाशिकमध्ये आ. देवयानी फरांदे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण; प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

Sat Sep 14 , 2024
मुंबई :- कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण ‘ हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ’ प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com