– प्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरू राहील
नवी दिल्ली :- दिल्लीतील प्रसिद्ध ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला गुरुवारी उत्साहात सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 6 इंच ते 3 फुट उंचीच्या विविध आकारांच्या आठशे गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांची किंमत 500 रूपयांपासून 26 हजार रूपयांपर्यंत आहे. हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दिल्लीतील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवणे हे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे. यासाठी आयोजित केलेल्या उपक्रमाला दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील 30 गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये अमराठी भक्तांचाही मोठा सहभाग असतो. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने ग्राहकांनी एम्पोरियममध्ये हजेरी लावून गणेशमूर्ती खरेदी केल्या, ज्यामुळे आयोजकांचे समाधान दिसून येते.
गेल्या 25 वर्षांपासून ठाणे येथील मूर्तिकार मंदार सूर्यकांत शिंदे हे आपल्या उत्कृष्ट शाडूच्या गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी ‘मऱ्हाटी’ एम्पोरियममध्ये सहभागी होत आहेत. यावर्षीही त्यांच्या मूर्तींना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, मुंबईच्या नीता भोसले यांनी मार्बल, फायबर, आणि रेडियमच्या शिवाजी महाराज, गणपती, कृष्ण, विठ्ठल रुक्मिणी यांच्यासह विविध मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
या वर्षीच्या प्रदर्शनात एस्कॉर्ट ग्रुपचे मालक नंदा परिवार, भीमजी जवेरी आणि दिल्लीतील प्रतिष्ठित व्यक्ती व वरिष्ठ अधिकारी यांनी ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममधून गणेशमूर्तीची खरेदी केली आहे, अशी माहिती मंदार शिंदे यांनी दिली.’बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार असून, अधिक माहितीसाठी 011-23363888 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.