नागपूर :- गणेशोत्सव हा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे, आनंदात विरजण पडू नये, पर्यावरणाची हानी होऊ नये, याकरिता नागरिकांनी नियमांचे पालन करित मिळून गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपा, पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन सज्ज असून, येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी (ता.२२) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग प्रमोद शेवाळे, अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग शिवाजी राठोड पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, निमित गोयल यांच्यासह पोलीस दलाचे अधिकारी, जिल्हा प्रशासकाचे अधिकारी व मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत यंदाच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या ऑनलाईन नोंदणीबाबत, एक खिडकी योजना व उत्सव/मिरवणुक शांततेत पार पाडण्याबाबत माहिती व चर्चा करण्यात आली.
अफवांवर विश्वास ठेऊ नका : डॉ. रवींद्र कुमार सिंगल
कार्यक्रमात मागदर्शन करतांना नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज आहे, नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा याकरिता पोलीस प्रशासन कार्य करीत असून, सणासुदीच्या कळत काही असामाजिक तत्त्वाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, आपल्याकडून कुठल्याही प्रकारे सामाजिक वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी. याशिवाय गणेशोत्सव शांततेत पार पडावा याकरिता नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अप्रिय घटना होई नये याची खबरदारी घ्यावी. पोलीस विभागासह प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले त्यांनी यावेळी केले. तसेच मिळून स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी प्रयत्न करू असेही डॉ. सिंगल यांनी केले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा: डॉ. अभिजीत चौधरी
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा,याकरिता मनपा प्रयत्नशील असून, नागरिकांनी देखील पारंपरिक आणि पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्तींच्या स्थापनेवर अधिक भर द्यावा. असे आवाहन डॉ. चौधरी यांनी यावेळी केले.
तसेच नागरिकांच्या सोयी करिता मनपाने ऑनलाईन परवानगी प्रणाली अमलात आणली आहे. गणेशोत्सव मंडळांनी या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून परवानगी प्राप्त करावी, ज्यांना ऑनलाईन मध्ये त्रास होत असेल अशा मंडळांकारिता मनपाच्या सर्व दहाही झोन निहाय एक खिडकी व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिकांच्या सोयीसाठी मनपाच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये “मदत कक्ष” स्थापन करण्यात येणार असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाद्वारे प्राप्त निर्देशानुसार गणेश मंडळांना लागणारा परवानगी शुल्क माफ करण्याचा करण्यात असून, परवानगी नि:शुल्क दिली जाणार असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगिलते.
मंडळात रक्तदानासह विविध उपक्रम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. इटनकर
सर्वत्र गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा तसेच पर्यावरणपूरक गणेश मंडळांना पुरस्कृत करण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024’ चे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी बैठकीत सांगितले. तसेच डॉ. विपिन इटनकर यांनी स्पर्धेची पात्रता, निकष, निवडसमिती, पुरस्कार आदी विषयांची माहिती दिली. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप मंडप जितके चौरस फूट असेल, त्यासंखेच्या किमान दहा टक्के तरी रक्तदान व्हावे या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले.
एक खिडकी योजनेचा लाभ घ्या – आंचल गोयल
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी गत वर्षाप्रमाणे यंदाही गणेश मंडप नोंदणीच्या ऑनलाईन सुविधेला सुरुवात करण्यात असली असून, प्रशासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेचा लाभ मंडळांनी घ्यावा, नागरिकांच्या सोयीसाठी मनापाद्वारे mynagpur अँपवरही गणेशोत्सव मंडळ परवानगीची सोय उपलब्ध असल्याचे गोयल यांनी सांगितले.
कार्यक्रमात गणेशोत्सवानिमित्त विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस आयुक्त (उत्तर) प्रमोद शेवाळे यांनी केले. तर सहायक पोलीस निरिक्षक चंद्रकांत कोसे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग शिवाजी राठोड यांनी मानले.