– नावनोंदणी ३० सप्टेंबर पर्यंत ; विलंब शुल्कासह नावनोंदणीची
– अंतिम मुदत ३० ऑक्टोबर
नागपूर :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परिक्षेसाठी खाजगीरित्या फॉर्म क्र.१७ मार्फत विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा १३ ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. नावनोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ आहे तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२४ आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या १० वी १२ वी च्या परिक्षेसाठी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरुन अर्जाची प्रत अर्जावर नमूद शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची प्रक्रिया १३ ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यापूर्वी ज्या शाळा किंवा महाविद्यालयातून ही परीक्षा द्यायची आहे तेथून संबंधित शाळा-महाविद्यालयाचा संकेतांक, विषय योजना, माध्यम, शाखा व इतर आवश्यक माहिती घेऊन ही नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरणे अनिवार्य असून ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परिक्षेकरिता https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करायचे असून १०वीच्या विद्यार्थ्यांना १००० रुपये नावनोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क असे एकूण ११०० रुपये तर १२ वीच्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये नावनोंदणी शुल्क तर १०० रुपये प्रक्रिया शुल्क असे एकूण ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. यासोबतच १० वीच्या विद्यार्थ्याना १०० रुपये आणि १२ वीकरिता 25 रुपये विलंब शुल्क भरुन अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/युपीआय/नेट बँकिंग अशा ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता ५वी किंवा इयत्ता ८वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फॉर्म १७ क्रमांक भरुन या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येणार आहे. या संदर्भातील माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीकरिता विद्यार्थ्यांसह, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा.