Ø अर्जांच्या छाणणीचे काम युद्धस्तरावर
Ø तालुकास्तरावर 25 कर्मचाऱ्यांचे पथक
Ø आतापर्यंत 4 लाख 62 हजार अर्ज दाखल
यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रशासकीय स्तरावर अर्ज छाणणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात यासाठी विविध विभागातील 25 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक काम करत आहे. योजनेसाठी आतापर्यंत 4 लाख 62 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी आतापर्यंत 4 लाखावर अर्जांची छाणणी झाली आहे.
शासनाने नुकतीच ही योजना सुरु केली आहे. योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांचा प्रतिसाद लाभत असल्याने अवघ्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर छाणणीचे काम केले जात आहे. सोबतच गाव व शहरस्तरावर अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील पार पाडली जात आहे.
पात्र महिलांना कालमर्यादेत लाभ देता यावा यासाठी तालुकास्तरावर विविध विभागांच्या सहकार्याने सदर छाणणीचे काम सुरु आहे. छाणणी प्रक्रियेत महिला व बालविकास विभागासह नगर पालिका, गटविकास अधिकारी कार्यालये. महसूल प्रशासनाची मदत घेतली जात आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छाणणीचे काम गतीने होण्यासाठी वॅार रुम तयार करण्यात आल्या असून तेथे एकत्रितपणे हे काम सुरु आहे. काही ठिकाणी तहसिल कार्यालय तर काही ठिकाणी नगर परिषदेत सदर वॅाररुम सुरु आहे.
यवतमाळ तालुक्यात अर्जांची संख्या जास्त असल्याने यवतमाळ येथे नगर परिषद व तहसिल कार्यालय अशा दोन ठिकाणी अर्जांची तपासणी सुरु आहे. योजनेतून पात्र महिलांना प्रत्येक महिन्यास 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेमुळे महिलांचे आर्थिक उत्थान होणार आहे.
योजनेसाठी शासनाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे सद्या प्रशासकीय स्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत अर्जांची तपासणी केली जात आहे. शासनाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर देखील समित्या स्थापन केल्या आहे. प्रशासकीय तपासणी झाल्यानंतर या समित्यांच्यावतीने अर्ज तपासले जाणार आहे. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. ज्या महिलांनी अद्यापर्यंत अर्ज भरले नसतील त्यांनी योजनेसाठी शासनाने तयार केलेल्या www.ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर किंवा नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज भरावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.