– भाजप महानगर कार्यकारिणीची बैठक
नागपूर :- शहराचा विकास करण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री प्रयत्न करतील. त्यांना हे काम करायचेच आहे. पण लोकांना जोडण्याचे काम कार्यकर्ताच करू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी (शनिवार) केले.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भाजप महानगर कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ना. गडकरी बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर माया इवनाते व दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता यांची उपस्थिती होती.
ना. गडकरी यांनी सुरुवातीला लोकसभेत विजय मिळवून दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘लालकृष्ण अडवाणीजी यांनी ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा आपल्या पक्षाचा उल्लेख केला होता. कारण इतर पक्षांमध्ये नेते तयार होतात आपल्या पक्षात कार्यकर्ते तयार होतात. अनेक वर्षे कार्यकर्त्यांच्याच शक्तीवर पक्ष उभा आहे आणि आज पक्षाला जे काही चांगले दिवस आलेय ते सुद्धा कार्यकर्त्यांमुळेच.’
१९८० साली आपल्या पक्षाची स्थापना झाली. मी त्याच वेळी पक्षाचे काम सुरू केले. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला राम जेठमलानी आले होते. नंतर आपल्या पक्षाला मोठे स्वरुप आले. पुढे अटलजींच्या नेतृत्वात सरकार आले आणि आता २०१४ मध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आले. विरोधी पक्षात असताना जनतेचा आवाज बुलंद करण्याची आणि जनतेवर होणाऱ्या अन्यायासाठी संघर्ष करण्याची शपथ आपण घेतली. त्या दृष्टीने काम केले. आणि त्याचवेळी सत्ता येईल तेव्हा समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण करायचे आहे, असेही म्हटले. आज आपली सत्ता आहे आणि आपल्याला शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार करायचा आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.