नागपूर :- सौर ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी महावितरणला सहा पुरस्काराने गौरविण्यात आले. ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन (एआयआरईए) तर्फ़े दिल्या गेलेल्या हे पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन ग़डकरी यांच्या शुभहस्ते नुकतेच नागपूर येथे प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांना राज्यातील विविध योजनांना चालना देण्यासाठी एआयआरईए नवीकरणीय ऊर्जा रत्न पुरस्कार, महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांना राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत किमान कालावधीत 1400 पेक्षा अधिक विक्रेते संलग्न केल्याबद्दल एआयआरईए नवीकरणीय ऊर्जा रत्न पुरस्कार, कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा) धनंजय औंधेकर यांना महाराष्ट्रात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे जलद अंमलबजावणी केल्याबद्दल एआयआरईए नवीकरणीय ऊर्जा रत्न पुरस्कार, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना राज्याच्या एकूण सौर स्थापनेपैकी सुमारे 25 टक्के स्थापना नागपूर जिल्ह्यात करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागाचा एआयआरईए नवीकरणीय ऊर्जा रत्न पुरस्कार तर सौर ऊर्जा उपकरणे विक्रेत्यांना उत्कृष्ट सहकार्य देण्याबद्दल कार्यकारी अभियंता शरद बंड आणि सहायक अभियंता इक्बाल खुर्शीद यांना ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते एआयआरईए नवीकरणीय ऊर्जा रत्न पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या व्दितीय वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्ताने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महावितरणच्या या यशालरिता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.