मुंबई :- सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स, प्रभादेवी आणि फोंडाघाट फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने “तेजोमय स्वरनाद” हा कार्यक्रम रविवार 28 जुलै, संध्याकाळी 6 वाजता करिश्मा हॉल, 5 वा मजला, रवींद्र नाट्यमंदिर आवार येथे आयोजित करण्यात आला आहे.
आषाढ महिना म्हटला, की सगळीकडे पडणारा पाऊस, हिरवी झालेली धरती, त्यामुळे प्रसन्न झालेले वातावरण असे चित्र असते. “आषाढस्य प्रथम दिवसे” असे म्हणत आपण त्याचे आनंदाने स्वागत करतो. विठ्ठलाच्या भेटीला निघालेले वारकरी आषाढी एकदशीला पांडुरंगाच्या पायाशी लीन होतात. याच महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते. आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या. या दीप अमावस्येचे सांस्कृतिक महत्त्व “तेजोमय स्वरनाद” कार्यक्रमातून उलगडले जाणार आहे.
इतिहासकालीन दिवे, त्यांचे वेगवेगळे उपयोग इ. रंजक माहिती आणि काही दुर्मीळ दिवे यावेळी बघायला मिळणार आहेत. दिव्यांचे संग्राहक आणि वक्ते मकरंद करंदीकर ही माहिती देणार असून निवेदिका दीपाली केळकर त्यांची मुलाखत घेतील. गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.
दिव्यांच्या अनुषंगाने येणारी विविध गाणी धनंजय म्हसकर, प्राची जोशी आणि श्रुती पोटे सादर करणार आहेत. वाद्य संगत हनुमंत रावडे, डॉ. हिमांशु गिंडे, वैभव कदम आणि तन्मय मेस्त्री यांची असेल. नृत्यांकुर डान्स अकादमीचे विद्यार्थी नृत्याविष्कार सादर करतील. कार्यक्रमाचे संयोजन प्रीती निनाद मांडके यांचे आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.