– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर :- समाजातील शेवटच्या व्यक्तीला उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळावी, हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरने पुढाकार घेतला आहे. सेंटरद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘फिरता दवाखाना’मुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचेल, असा विश्वास जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’चे आज बुधवारी (ता.२४) सिव्हिल लाईन्स येथील ‘देवगिरी’ येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी माजी महापौर व श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी उपस्थित होते.
गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’च्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी संदीप जोशी यांचे अभिनंदन केले.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याला लाभलेले एक संवेदनशील नेतृत्व आहेत. गोरगरीब आणि गरजूंपर्यंत आवश्यक त्या सर्व सुविधा पोहोचविण्याबाबत त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. त्याच संवेदनशीलतेतून ‘फिरता दवाखाना’ त्यांनी सुरू केला. त्यांच्या संकल्पनेमार्फत गरजूंना लाभ मिळावा यासाठी श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनने पुढाकार घेतला. धर्म, संस्कार, सेवा, शिक्षण अशा विविध बाबींवर काम करीत फाउंडेशनने आरोग्य सेवेसाठी घेतलेला पुढाकार हा आदर्शवत आहे, असे सांगतानाच बावनकुळे यांनी श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाला पराग सराफ, रमेश सिंगारे, प्रकाश भोयर, विनोद कन्हेरे, सतीश होळे, बादल राउत, प्रगती पाटील, कविता सरदार, वर्षा चौधरी, मनीषा काशीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कॅटरॅगपासून ते हृदयविकाराची शस्त्रक्रिया नि:शुल्क : संदीप जोशी
शहरातील अनेक भागात आरोग्य सेवा सहजरित्या उपलब्ध होत नाही. झोपडपट्टी व जिथे आरोग्य सेवा सहज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी सहजरित्या दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’ कार्यरत असणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १२ झोपडपट्टी अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. या झोपडपट्टीमध्ये परिसरात जाउन ‘फिरता दवाखाना’ नि:शुल्क आरोग्य सेवा प्रदान करेल. या ‘फिरता दवाखाना’मध्ये तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करून आवश्यक उपचार करतील. रुग्णांना नि:शुल्क औषध देखील पुरविण्यात येतील. श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनद्वारा संचालित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर ‘फिरता दवाखाना’च्या माध्यमातून कॅटरॅगपासून ते हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेपर्यंतचे सर्व उपचार नि:शुल्क मिळणार आहेत, अशी माहिती याप्रसंगी माजी महापौर व श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.