अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- समाजापुढे सध्या अंमली पदार्थांचे मोठे आव्हान असून हा चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकारने देखील याअनुषंगाने बैठक घेऊन सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना एक संयुक्त कृती आराखडा दिला आहे. त्यानुसार अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डार्कनेट, कुरियर, थेट संदेश, इन्स्टाग्राम, फेसबुक चॅट अशा विविध माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री केली जाते. हे रोखण्यासाठी संबंधित विविध विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. कुरियर कंपन्या, पोस्ट या यंत्रणांना कुरियरचे स्कॅन कसे करावे, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निर्यात होणाऱ्या मालामध्ये कंटेनरमध्ये खाली अंमली पदार्थ ठेवले जात असल्याचे आढळून आल्याने बंदरांनाही सतर्क करण्यात आले आहे. आता झिरो टॉलरन्स पॉलिसी हाती घेण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात सर्व संबंधित विभागांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 2023 साली केलेल्या कार्यवाहीत 400 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला. राज्यात मागील वर्षात एकूण 12,648 कारवायांमधून 897 कोटी रुपयांचा माल जप्त केला होता. या तुलनेत यावर्षी मे महिन्यापर्यंत 6529 कारवायांमधून 4131 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात पोलिसांचा सहभाग आढळला तर आता निलंबनाऐवजी त्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे सांगून आतापर्यंत सहा पोलिसांना बडतर्फ केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील माहिम येथील रहेजा उड्डाणपुलावर हेरॉईन विकणाऱ्या एका तरुणाला 54 लाख रुपयांचे 270 ग्राम हेरॉईन बाळगल्याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून 31 मार्च 2024 रोजी अटक केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे उत्तराखंडमध्ये आढळून आल्याने समन्वयाने पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मिशन पुना आकी' संपन्न,जन्म दाखला-आधार कार्ड कॅम्पचा अनेकांना लाभ

Fri Jul 12 , 2024
गडचिरोली :- पंचायत समिती भामरागड तर्फे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत ‘मिशन पुना आकी’ म्हणजेच ‘मिशन नवी सुरवात’ ही मोहीम नुकतीच पार पडली. या मोहिमेअंतर्गत भामरागड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जून महिन्यात एक दिवसीय शिबिराच्या आयोजनातून आधार कार्ड, जन्म दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बॅंक अकाऊंट अशी महत्वाची कागदपत्रे ग्रामस्थांना गावातच उपलब्ध करून दिली गेली. तसेच महत्वपूर्ण योजनांचा लाभ व माडिया भाषेतून पथनाट्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!