विद्यार्थ्यांशी साधला संवाद : शैक्षणिक चाचणीही घेतली
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने टेका नाका, सन्याल नगर येथील नागपूर महानगरपालिकेच्या जी.एम. बनातवाला इंग्रजी शाळेच्या परिसरात मंगळवारी (ता.२) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, माजी नगरसेविका सविता सांगोळे, शिक्षण विभागाचे विनय बगले, शाळेच्या मुख्याध्यापिक आणि शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
वृक्षारोपणानंतर मनपा आयुक्तांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली. वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टीने त्यांनी विद्यार्थ्यांची चाचणी सुद्धा घेतली. फळ्यावर विद्यार्थ्यांना गणिताचे प्रश्न देण्यात आले विद्यार्थ्यांनी समोर येउन आयुक्तांना सोडवून दाखविले. यावेळी आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे कौतुक सुद्धा केले. शाळेमध्ये नुकतीच ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आली आहे. या लॅबची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पाहणी केली. याशिवाय संगणक लॅब याची देखील आयुक्तांनी पाहणी केली. आढळलेल्या त्रुट्या तात्काळ दूर करून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
प्रारंभी शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी जी.एम. बनातवाला शाळेविषयी आयुक्तांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात प्रयोगातून विज्ञान शिकता यावे यासाठी आमदार प्रवीण दटके यांच्या आमदार निधीतून मनपाच्या ७ शाळांमध्ये ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये जी.एम. बनातवाला इंग्रजी शाळेतही लॅब उभारण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा फायदा आणि वाढलेली शैक्षणिक गुणवत्ता याबाबत शिक्षणाधिका-यांनी अवगत केले.