– मलेशिया राज्याशी व्यापार, पर्यटन, विज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक – दातो मुजफ्फर शाह मुस्तफा
मुंबई :- मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ व सहकार्याचे असून येत्या तीन वर्षात उभय देशांमधील व्यापार २० अब्ज डॉलर वरुन २५ अब्ज डॉलर इतका वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा व पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य मलेशियाकरिता सर्वात महत्वाचे असेल असे प्रतिपादन मलेशियाचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त दातो मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी येथे केले.
मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी गुंतवणूक, व्यापार व पर्यटन विषयक मलेशियाच्या शिष्टमंडळासह गुरुवारी (दि. ३०) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम लवकरच भारतभेटीवर येण्याची शक्यता असून आपल्या दौऱ्यात ते मुंबईला देखील भेट देण्याची शक्यता असल्याचे मुस्तफा यांनी सांगितले. मलेशियाला सेमीकंडक्टर निर्मितीचा ५० वर्षांचा अनुभव असून मलेशिया – भारत डिजिटल सहकार्य परिषदेच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्था तसेच सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात मलेशिया भारत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मलेशिया भारतीयांना आगामी वर्षभर आगमनानंतर विजा देत असून भारताने देखील मलेशियातून येणाऱ्या नागरिकांना आल्याबरोबर विजा उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारतातून मलेशियाला गेल्यावर्षी ७ लाख पर्यटक आले असून यंदा त्याहून अधिक पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या दृष्टीने मलेशियन मुंबई, दिल्ली व चेन्नई येथे पर्यटन कार्यालये उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. मलेशिया वेडिंग डेस्टिनेशन, गोल्फ या दृष्टीने भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पाम तेलाबाबत गैरसमज दूर करणार
मलेशिया भारताला ३० लक्ष टन पामोलिन तेल निर्यात करीत आहे. पामोलिन हे खाद्य तेल असले तरीही या तेलाबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत असे सांगून ते दूर करून पाम तेल आरोग्यासाठी चांगले आहे हे पटवून देण्यासाठी मलेशिया प्रयत्न करीत असल्याचे उच्चायुक्त मुस्तफा यांनी सांगितले.
जगाची लोकसंख्या वाढत असताना पाम तेलांमुळेच लोकसंख्येची खाद्य तेलाची गरज पुरी होऊ शकते असे त्यांनी सांगितले. एक हेक्टर क्षेत्रफळातून तीस वर्षे ८ टन पाम तेलाची निर्मिती होत असल्यामुळे पाम लागवड शेतकऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताने नवीन परराष्ट्र व्यापार नीती जाहीर केली असून मलेशियाने भारताशी पारंपरिक क्षेत्रांशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा, सेमीकंडक्टर निर्मिती व स्टार्टअप क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. भारत जगाचे औषध निर्मिती स्थळ म्हणून उदयास आले असून उभय देशांनी जेनेरिक औषध निर्मिती, वॅक्सीन विकास व आरोग्य कर्मचाऱ्यांची गतिशीलता या क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे असे राज्यपालांनी सांगितले.
बैठकीला मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी यूसोफ तसेच गुंतवणूक, पर्यटन व व्यापार विषयक कार्यालयांचे भारतातील प्रतिनिधी उपस्थित होते.