Ø तक्रारींसाठी कृषी विभागाकडून क्रमांक जाहीर
Ø अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन
यवतमाळ :- खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशकाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. सदर कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. दर्जाबाबत किंवा बोगस निविष्ठांबाबत शेतकऱ्यांना तक्रार असल्यास त्यांनी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्तम दर्जाच्या उपलब्धता व्हाव्यात तसेच जिल्ह्यात कोठेही बोगस बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके विक्री होऊ नये, यासाठी कृषि विभागाच्यावतीने हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. बोगस व गुणवत्ता नसलेल्या या निविष्ठा आढळून आल्यास शेतकऱ्यांनी त्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषि अधिकारी यांना द्यावी.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बि-बियाणे, रासायनीक खते किंवा किटकनाशके याबाबत तक्रार नोंदविता यावी यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष स्थापण करण्यात आला आहे. या कक्षामध्ये संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक 9403229991 उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या अनुषंगाने आवश्यक असणारा बि-बियाण्यांचा साठा आवश्यक्तेप्रमाणे बाजारामध्ये उपलब्ध होत असून सर्व बियाणे उत्पादक कंपनी व विविध वानांची उत्पादकता जवळपास सारखीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वानाचा आग्रह धरु नये. कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी त्यांच्या विक्री केंद्रामध्ये उपलब्ध असलेले बि-बियाणे, रासायनीक खते व किटकनाशके यांचा साठा केंद्राच्या दर्शनीय भागामध्ये साठा फलक लावून त्यावर कंपनीचे नाव, वान, दर व शिल्लक साठा इत्यादी तपशील अद्यावत ठेवावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी कळविले आहे.