गोंदिया :- मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे, शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या हेतूने गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात तीन महिने कालावधीचे कराटे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येत असून त्याची सुरुवात नुकतीच करण्यात आली.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात महाविद्यालयातील अंतर्गत निवारण समितीच्या वतीने तीन महिने कालावधीचे कराटे प्रशिक्षण खास मुलींसाठी राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण शिबिराला नुकतीच सुरुवात झाली. उदघाटणीय कार्यक्रमाला वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मोहतुरे, अंतर्गत निवारण समितीच्या प्रमुख डॉ. अर्चना जैन, खेळ आणि क्रीडा कारकीर्द विकास फाउंडेशनचे दीपक सिक्का, मानव हक्क संघटनेचे जिल्हा सचिव आदेश शर्मा, राज्य सचिव धार्मिष्ठा सेंगर उपस्थित होते. कराटे प्रशिक्षण दीपक सिक्का यांनी विविध प्रात्यक्षिके करून विद्यार्थिनीनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, यावर मार्गदर्शन केले. लहान लहान बाबी सुद्धा लक्षात ठेवल्या तरी संकटकाळी स्वतःचा बचाव स्वतः करता येईल. हिम्मत न हारता आत्मविश्वासाने संकटाला सामोरे गेले तर नक्कीच यशस्वी होऊ असे, दीपक सिक्का यांनी सांगितले. आई वडील हे आपले हितचिंतक नव्हे सर्वस्व. मुलींनी आईवडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये. मोबाईलचा मर्यादेत वापर करावा, संकटकाळी ११९ या टोलफ्री क्रमांकाचा वापर करावा, असे आदेश शर्मा यांनी सांगितले. संकटकाळी स्व शक्ती महत्वाची. स्वतःचे कौशल्य महत्वाचे. त्यामुळे मुलींनी स्व संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे सांगत धार्मिष्ठा सेंगर यांनी विश्वकर्मा योजनेची माहिती दिली. यावेळी डॉ. रवींद्र मोहतुरे, डॉ. अर्चना जैन यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अश्विनी दलाल तर आभार डॉ. सरिता उदापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. परवीन कुमार, डॉ. सौरभ चाटुले यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदीनी परिश्रम घेतले.