– “सिटी ईव्ही एक्सीलरेटर” कार्यशाळेलां उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाच्या वापरामुळे वाढते प्रदुषण लक्षात घेता, नागपूर शहरात विद्युत वाहनांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक असून, नागपूर महानगरपालिकाद्वारे विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील काळात शहरात १५० चार्जींग पॉइंट उभारणार येतील असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
शनिवार (ता.२०) रोजी “सिटी ईव्ही एक्सीलरेटर” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, आरएमआयच्या(RMI)व्यवस्थापकीय संचालक अक्षिमा घाटे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड नागपूरचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त श्री. रविंद्र भेलावे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र राठोड यांच्यासह महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL), नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर मेट्रो, आरटीओचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, वाढत्या वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्युत वाहनांचा वापर केल्यास आपण एक शुद्ध वातावरण निर्माण करू शकतो. सार्वजनिक वाहतुकीसाठी १०० टक्के पर्यावरण पूरक वाहनांना प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिका देखील पुढील दोन वर्षात ‘आपली बस’ च्या ताफ्यात पूर्ण इलेक्ट्रिक बसेसला प्राधान्य देणार आहे. मनपाला ‘पीएम ई- बसेस योजना’ अंतर्गत १५० ई बसेस प्राप्त होणार आहेत. तसेच राज्य शासनाकडून देखील निधी प्राप्त झाला आहे. पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे, मनपाच्या ई-बस सेवेच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सोयीसुविधा पुरविला जात आहेत. शहरातील विद्युत वाहनांची संख्या बघता वर्ष २०२५ पर्यंत विविध ठिकाणी १५० चार्जिंग पॉइंट उभारण्याचा मानस मनपाचा असल्याचेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.
कार्यशाळेत चर्चा झालेल्या मुद्द्यांबाबत सहभागीदारांनी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्यापुढे मुद्देसूद सादरीकरण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी कार्यशाळेत चर्चा झालेल्या संपूर्ण मुद्द्यांबाबत समाधान व्यक्त करीत नागपूर हे ऐतिहासिक शहर विद्युत वाहनांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याकरिता देशाला मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. याशिवाय मनपा आणि नागपूर मेट्रो त्यांच्यातील शहरांतर्गत वाहतुकीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याचे ठरविले असल्याचेही सांगितले.
आरएमआयच्या व्यवस्थापकीय संचालक अक्षिमा घाटे यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिका येथे विशेष ईव्ही सेलची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ईव्ही धोरण- २०२१ द्वारे नागपूर शहरासाठी निर्धारित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी ईव्ही सेलची स्थापना हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ईव्हीसेल मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांसह महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL), नागपूर नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आरटीओचे प्रतिनिधी यांचासमावेश आहे. ईव्ही सेलच्या माध्यमातून विद्युतवाहनांसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदार पाटील यांनी आभार व्यक्त केले.
*कार्यशाळेत विवीध विषयांवर चर्चा*
“सिटी ईव्ही एक्सीलरेटर” कार्यशाळे अंतर्गत विवीध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर विषयावर फॅसिलिटेटर श्री. नुवोदिता सिंग, को-फॅसिलिटेटर हर्षा पल्लेरलामुडी यांनी मार्गदर्शन केले. तर फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि अर्बन फ्रेट या विषयावर फॅसिलिटेटर मंदार पाटील, को-फॅसिलिटेटर स्वप्नील फुलारी आणि शिल्पी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. तर सार्वजनिक वाहतूक विद्युतीकरण या विषयावर फॅसिलिटेटर रमित रौनक, को-फॅसिलिटेटर अखिल सिंघल यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित सर्वांनी विषयावर सकारात्मक चर्चा करीत सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन तयार करण्यासाठी मदत केली.