· राज्यपालांच्या हस्ते संजय मुखर्जी, प्रवीण दराडे यांसह ‘नव भारत’चे शिल्पकार सन्मानित
मुंबई :- विकसित भारताचा महामार्ग विकसित शिक्षण प्रणाली, विकसित आरोग्य सेवा, उद्यमशीलता व नवसृजनाच्या वाटेने जातो, असे सांगून विकसित भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी नव्या भारतातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १३) प्रशासन, पोलीस, आरोग्यसेवा, समाजकार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ६५ व्यक्तींना ‘नव भारत के शिल्पकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
प्रकाशनाचे ९० वर्षे साजरे करीत असलेल्या नवभारत समूहातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून नवभारत समूहातर्फे ‘शिव राज्याभिषेक ३५० वर्ष’ या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनी भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला आला आहे. आपल्याला भेटणारे विविध देशांचे राजदूत, विविध देशांचे संसद सदस्य या सर्वांचे या बाबतीत मतैक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारत येत्या काही वर्षात जगातील तिसरी मोठी आर्थिक सत्ता होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला असल्याचे सांगून विकसित भारत ध्येय गाठण्यासाठी विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या दृष्टीने आपण राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना ‘विकसित विद्यापीठ’ बनविण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
नवभारत नवराष्ट्र तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर सचित्र ग्रंथ काढल्याबद्दल आनंद व्यक्त करुन प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे महिलांचा सन्मान, विविध धर्म व पंथांचा आदर व जनसामान्यांचे कल्याण यासाठी कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, माजी मंत्री व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील व नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी उपस्थित होते. .
यावेळी राज्यपालांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी पल्लवी दराडे, स्नेहलता कोल्हे (संजीवनी समूह), राजेश गोयल (कोहिनुर समूह), महानगर पालिका आयुक्त छत्रपती संभाजी नगर जी श्रीकांत, पोलीस आयुक्त अमरावती नवीनचंद्र रेड्डी, शशांक परांजपे (परांजपे स्कीम), चिंतन देसाई (सोसायटी टी) आदींना ‘नव भारत के शिल्पकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.