संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासनाचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रास्त भाव दुकानदारांनी 1 जानेवारी पासून संप पुकारला आहे त्यामध्ये कामठी तालुक्यातील समस्त स्वस्त धान्य दुकांनंदारांनी सहभाग घेतल्याने दुकांनाना कुलूप लागले आहे.त्यामुळे या दुकानातुन धान्य वितरण बंद झाले असून सामान्य व गरीब ग्राहकांची पंचायत झाली आहे.
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार रुपये करा,मार्जिन मनी 300 रुपये करा,टू जी ऐवजी फोर जी मशीन द्या,कालबाह्य नियम बदला,आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणाडाळ ,तूरडाळ,मुगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा आदी मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.प्रलंबित न्याय हक्क मागण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे.त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना टाळे लावून संपात सहभागी झाले आहेत.