नागपूर :-सी.पी.अॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिलिटरी स्कूलचे स्नेहसंमेलन नुकतेच झालेल्या वसंतराव देशपांडे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी कर्नल एस.जे. मुजुमदार उपस्थित होते. कार्यक्रमाला सी.पी.अॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ए.एस.देव, सचिव अनिल महाजन, व शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावर्षीचा कार्यक्रम ‘स्वराज’ या संकल्पनेवर आधारित होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत ज्या हुतात्म्यांनी भारत देशासाठी बलिदान दिले, त्यांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांनी साकार केली. शिवाजी महाराज, मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, सॅम माणिक शाॅ, मेजर सोमनाथ शर्मा, कॅप्टन विक्रम बत्रा तसेच पुलवामा अटॅक मधील हुतात्म्यांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांनी अतिशय स्फूर्ती व उत्साहाने सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे खुपच कौतुक केले. अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना भारतीय इतिहासाची जाणीव करून दिल्याबद्दल शाळेची विशेष प्रशंसा केली. याप्रसंगी शिक्षण, कला तसेच खेळ क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. संचालन मृणाल काटे यांनी केले. तसेच ‘स्वराज’ संकल्पनेचे व नाटिकेचे लेखन शाळेच्या शिक्षिका वैशाली भुसारी यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षिकांनी व पर्यवेक्षकांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमा प्रसंगी 300 ते 400 लोकांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.