आज रेशीम कार्यशाळा
नागपूरकरांनी परिवारासह भेट देण्याचे आवाहन
दोन दिवसात 16 लाख 500 हजारांची उलाढाल
24 डिसेंबरपर्यंत महोत्सव
नागपूर :- जिल्हा कृषी महोत्सवात उद्या 22 डिसेंबरला 11 वाजता होणाऱ्या ” रेशीम उद्योग” विषयावरील कार्यशाळेस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सौम्या शर्मा यांनी केले आहे. तसेच नागपूरकरांनी या 24 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),कृषी विभाग नागपूरद्वारा आयोजित जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य कृषी महोत्सवास कृषी महाविद्यालय वस्तीगृह परिसर क्रीम्स हॉस्पिटल समोर नागपूर येथे सुरवात झालेली असून आज महोत्सवाचे तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी भेट दिली. स्टॉलधारक शेतकरी ,महिला गट यांच्याशी चर्चा केली व कृषी मालाची खरेदीही केली. या प्रसंगी आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.अर्चना कडू व प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले प्रामुख्याने उपस्थित होत्या.
21 डिसेंबरला बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत मंजूर सीबीओचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये स्मार्ट प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली तसेच सिबीओच्या समस्या व अडचणींवर मार्गदर्शन व उपाय योजना सुचविण्यात आल्या. या चर्चा सत्रात नागपूर जिल्हातील सिबीओने सहभाग घेतला. याप्रसंगी स्मार्ट नागपूर विभागाच्या नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, डॉ अर्चना कडू उपस्थित होते.
नागपूर जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्टचे नोडल अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम , कृषि महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक डॉ. वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यांचे समस्यांचे निराकरण केले.
जिल्हा कृषी महोत्सवात मागील दोन दिवसात तांदूळ 54 क्विंटल -4 लाख् 32 हजार रुपये , संत्रा 11 क्विंटल -1 लाख 10 हजार रुपये व इतर वस्तू 54 क्विंटल -97 हजार 200 रुपये व खाद्यपदार्थांची 1 लाख 42 हजार रुपये असे एकूण रुपये 16 लाख 56 हजार रुपयांची उलाढाल झालेली आहे.
नागरिकांचा प्रतिसाद व स्टॉलधारकांची मागणी असल्याने या धान्य महोत्सवाचा कालावधी वाढवून 24 डिसेंबर रविवारपर्यंत वाढविण्यात आला आहे.