नागपूर :- राज्यात सर्वात मोठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. राज्याची पोलीस प्रशिक्षण क्षमता ही ८ हजार आहे. ही क्षमता कमी असल्यामुळे तुकडीनिहाय प्रशिक्षण देण्यात येते. राज्यात सध्या असलेल्या पोलीस प्रशिक्षण क्षमतेमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याप्रकरणी सदस्य रवींद्र वायकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेऊन पोलीस भरती करण्यात येईल. भरतीसाठी उमेदवार एकाच जिल्ह्यात अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उमेदवारांची प्रतीक्षा यादी ही एक वर्ष कालावधीसाठी असते. त्यानंतर त्यांचा विचार करता येत नाही. परंतु ज्या उमेदवारांची निवड झाली आहे. ते ‘एज बार’ होत नाही. त्यामुळे त्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही, त्यांना रुजू करून घेण्यात येईल.
राज्यात खासगी पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्राची पोलिस स्टेशन निहाय माहिती गोळा करण्यात येईल. प्रशिक्षण केंद्रासाठी राज्यात एस. ओ.पी (प्रमाणित कार्यप्रणाली) करण्यात येईल. एस.ओ.पी मधील नियमानुसार प्रक्षिक्षण केंद्र सुरू आहेत की नाही हे तपासून पाहण्यात येईल. नालासोपारा येथे विजय भव या खासगी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य आशिष शेलार, यामिनी जाधव, सुलभा खोडके, अनिल देशमुख यांनी भाग घेतला.