नागपूर :- शहरासोबतच ग्रामीण भागातुनही दुचाकी चोरी करणाºया अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधण्यात शहर गुन्हेशाखेच्या युनिट क्र. ५ च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीस अटक करून, त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले असून, या गुन्ह्यातील चोरीचे चारही वाहने जप्तही केली आहेत.
सैय्यद नौशाद अली सैय्यद मुनावर अली (वय ४२) रा. राणीदुर्गावती चौक यादवनगर गल्ली नं. ३ असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ४ नोव्हेंबरला रात्री १० ते ११ च्या सुमारास मेयो हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये शिवम सुरेश टेभूर्णे (वय २३) याने त्याच्या मालकाची एमएच ३१ डीजे ७००१ ही दुचाकी पार्क करून मुलाला दवाखान्यात घेऊन गेला होत. यावेळी अज्ञात चोरट्याने तेथून वाहन चोरी केले होते. यासंदर्भात फिर्यादी उत्कर्ष प्रेमानंदन भैसारे (वय ३३) रा. भानखेडा यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथकही करत होते. पथकाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून आरोपी सैय्यद नौशाद अली सैय्यद मुनावर अली यास ताब्यात घेत त्याची विचारणा केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आरोपीस अटक करून त्याची अधीक सखोल चौकशी केली असता, त्याने तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतुनच एमएच ३१ ७७८७, पाचपावली परिसरातुन एमएच ४० ८५८२ व मौदा परिसरातुन एमएच ४९ एव्ही २६५६ अशी एकूण चार वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातुन पोलिसांनी नमुद चारही वाहने जप्त करुन त्याला जप्त मुद्देमालासह तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.