– नमाद महाविद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सहभागींचा सूर
गोंदिया :- दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाला यशस्वी व्हायचे असेल तर सुरक्षा परिषदेचा विस्तार करणे आवश्यक असुन भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला सहभागी करून केले काळाची गरज असल्याचा सूर विध्यार्थ्यानी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापना दिवसानिमित्ताने विश्व शांततेत संयुक्त राष्ट्र संघाची भूमिका या विषयावर येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विध्यार्थी बोलत होते.
द्वितीय महायुद्धाच्या समाप्तीनंतर २४ ऑक्टोबर १९४५ ला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून व सध्याच्या जागतिक घडामोडीशी संलग्न विषयाला घेऊन गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या अंतर्गत विश्वशांततेत संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. एस यु खान तर प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मोहतुरे, डॉ. बबन मेश्राम, डॉ. एच पी पारधी, डॉ. किशोर वासनिक तसेच परीक्षक म्हणून प्रा. योगेश भोयर, डॉ. विनोद गेडाम उपस्थित होते. विश्वशांततेत संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका या विषयाला घेऊन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विध्यार्थ्यानी साधक बाधक चर्चा केली. संयुक्त राष्ट्र संघाचा इतिहास सांगत जागतिक शांततेसाठी आणि कल्याणासाठी जागतिक संघटनेची गरज अधोरेखित केली. सोबतच विश्व पटलावरील या संघटनेला आपल्या उद्देशात यशस्वी व्हायचे असेल तर सुरक्षा परिषदेचा विस्तार करणे आवश्यक असल्याचे सहभागींनी आपल्या भाषणात नमूद केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. एस यु खान यांनी जागतिक इतिहाचा धांडोळा घेत सध्या जगात सुरु असलेल्या रशिया – युक्रेन आणि इस्त्रायल – पॅलेस्टाईन युद्ध मागील कारणमीमांसा स्पष्ट केली. सोबतच जागतिक परिस्थिती आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या यशातच मानवाचे कल्याण आहे. प्रत्येकाला मानवाधिकार मिळवून देण्याची जबाबदारी सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाची असल्याचे डॉ. खान यांनी सांगितले. वक्तृत्व स्पर्धेत शीतल ठाकरे प्रथम, भाग्यश्री खोब्रागडे द्वितीय तर उत्तेजनार्थ पुरस्कार अंकुश आसोले यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी डॉ. मस्तान शाह, डॉ. अंबादास बाकरे,डॉ. राजू पटले, प्रा. प्रणव वासनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. घनशाम गेडेकर, प्रास्ताविक डॉ. किशोर वासनिक तर आभार डॉ. शशिकांत चौरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यानी परिश्रम घेतले.