नागपूरात आजपासून खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे राज्यस्तरीय प्रदर्शन

– प्रदर्शनात 50 स्टॉल; सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी 

नागपूर :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर यांच्यावतीने महात्मा गांधी जयंती निमित्त १ ते ८ ऑक्टोबर दरम्यान खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे राज्यस्तरीय विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित या प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थीतीत होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागपुरकरांसाठी नि:शुल्क खुले असणार आहे.

खादीपासून निर्मित विविध कापडांचे 25 स्टॉल्स या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात येणार असून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने खादी ग्रामोद्योग मंडळाकडून खादीच्या वस्तूंवर 20 टक्के सवलत असणार आहे. या सोबतच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, मध केंद्र योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध झालेल्या उद्योजकांचेही 25 स्टॉल्स राहणार आहेत.

या प्रदर्शनात महाबळेश्वर येथील शुद्ध मधुबन मध, वर्धा-नागपूर येथील खादीचे दर्जेदार कपडे, विविध प्रकारचे मसाले, लाकडी घाण्यावरील तेल, लाकडी हस्तकलेच्या वस्तू, फायबर मूर्ती, बांबूच्या कलात्मक वस्तू, आवळा खाद्य पदार्थ, गुळ, मेणबत्ती आदी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे.

ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन वस्तू खरेदी कराव्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज जागतिक ‘ज्येष्ठ नागरिक दिवस’

Sat Sep 30 , 2023
नागपूर :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने येथील श्रध्दानंदपेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रविवार दि. 1 ऑक्टोंबरला सकाळी 10.30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा. त्यांचे जिवन सुसह्य व्हावे, शारिरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com